निर्मल शौचालय तोडण्यात आल्याने लोकांची होतेय प्रचंड गैरसोय

लांजा नगर पंचायतीने फिरत्या शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी

लांजा : सर्वांना सोयीचे ठरणाऱ्या निर्मल शौचालयावर प्रशासनाकडून हातोडा फिरवण्यात आल्याने सध्या कामानिमित्त शहरात येणारे ग्रामस्थ, व्यावसायिक, रिक्षा व्यवसायिक, टेम्पो व्यवसायिक, दुकानदार तसेच अन्य सर्वच नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
दरम्यान, नवीन शौचालयाची इमारत बांधण्यास बराच कालावधी जाणार असल्याने नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता
नगरपंचायत प्रशासनाने मंगळवारचा आठवडा बाजार तसेच इतर दिवशी फिरत्या शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे .
लांजा शहरात मुंबई गोवा महामार्गाला लगत आणि शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी निर्मल शौचालय उभारण्यात आले होते. हे निर्मल शौचालय सर्वच नागरिकांना अतिशय सोयीचे ठरत होते. शहरात विविध कामानिमित्त येणारे नागरिक, मंगळवारचा भरणारा आठवडी बाजार त्याचप्रमाणे येथील रिक्षा व्यवसायिक, टेम्पो व्यवसायिक व अन्य छोटे मोठे व्यावसायिक त्याचप्रमाणे नागरिक, प्रवासी वर्ग आणि विद्यार्थी यांना देखील निर्मल शौचालय हे सोयीचे ठरत होते.
मात्र मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात या शौचालयाची अर्धी इमारत बाधित होत असल्याने नुकतीच ही इमारत पूर्णपणे तोडण्यात आली आहे.‌ निर्मल शौचालयाची इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. सध्या लांजा बस स्थानक किंवा तहसील कार्यालय या ठिकाणी असणाऱ्या सार्वजनिक मुताऱ्या ,शौचालयांचा नागरिकांना आधार घ्यावा लागत आहे. मात्र या दोन्ही ठिकाणी जाणे नागरिकांसाठी थोडे गैरसोयीचे ठरत आहे. मात्र शहरात अन्य ठिकाणी सार्वजनिक शौचालय नसल्याने नागरिकांचा नाईलाज होत आहे.
त्यामुळे लांजा शहरासह तालुक्यातील नागरिक, प्रवासी वर्ग आणि सर्वांचीच शौचालय अभावी होणारी गैरसोय लक्षात घेता लांजा नगरपंचायत प्रशासनाने या ठिकाणी फिरत्या शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.‌ जेणेकरून नागरिकांची होणारी गैरसोय टळेल अशी मागणी आता नागरिकांतून केली जात आहे.