दापोलीत ‘तुकाराम मुंढे स्टाईल’ धडक कारवाई!

२४ हजारांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखू जप्त; एकाविरुद्ध गुन्हा

 

दापोली | प्रतिनिधी:

 

दापोली पोलिसांनी मानवी आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करत प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला. आंबा पॉईंट परिसरात केलेल्या या कारवाईत तब्बल २४ हजार २०० रुपयांचा प्रतिबंधित माल हस्तगत करण्यात आला असून, एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबा पॉईंट येथील काळ्या वडापाव दुकानासमोर संशयास्पदरीत्या प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. यामध्ये कृष्णा नारायण गवळी (वय ६०, रा. दापोली) याच्या ताब्यातून केसरीयुक्त विमल पान मसाल्याची १,२१० पाकिटे आणि सुगंधित तंबाखूची १,२१० पाकिटे असा मोठा साठा जप्त करण्यात आला.

 

मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या प्रतिबंधित पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.