अल्टोची वॅगन आरला जोरदार धडक, महिला जखमी
खेड (प्रतिनिधी) – मुंबई–गोवा महामार्गावरील भरणे नाका येथे शुक्रवारी रात्री सुमारे ९.१५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. महामार्गावर उभ्या असलेल्या मारुती वॅगन आर कारला पाठीमागून आलेल्या अल्टो कारने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी तीव्र होती की वॅगन आर कार काही मीटर पुढे फरफटत गेली, तर अल्टो कार महामार्गालगत असलेल्या दुभाजकावर चढली.
या अपघातात अल्टो कारमधील एक महिला प्रवासी जखमी झाली असून तिला तातडीने भरणे नाका परिसरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
या अपघाताच्या वेळी दोन्ही वाहने चिपळूणच्या दिशेने जात होती. या धडकेमुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.
अपघातातील वॅगन आर कार खेड तालुक्यातील कळंबनी येथील असल्याची, तर अल्टो कार गुजर तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून याप्रकरणी संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.











