वाचन संस्कृती रुजवून आत्मसात करणे काळाची गरज- माधव अंकलगे

चिपळूण (प्रतिनिधी) : वाचन संस्कृती रुजविणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांनी वाचलं तरच त्यांना नवनवीन कल्पना, विचार मांडता येतील. विद्यार्थ्यांनी भाषिक कौशल्ये आत्मसात करावीत, यासाठी वाड्मय मंडळाचे महत्व आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना लिहिण्याची, व्यक्त होण्याची संधी मिळत असते. यातून आपली साहित्यिक सुरुवात होत असते. आजच्या तरुणांत व समाजात असलेली अस्वस्थता प्रकटपणे मांडण्याची आवश्यकता असून त्यासाठी तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे.
समाजातील आत्महत्या वा अपप्रवृत्ती टाळण्यासाठी लेखन व वाचन अत्यंत उपयुक्त ठरणार असून त्यासाठी शाळा, महाविद्यालये, शिक्षक, पालक आणि व्यवस्थेने पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मत प्रमुख पाहुणे माधव अंकलगे यांनी केले. औचत्य होते फाटक हायस्कूल व श्रीमान वि. स. गांगण कला, वाणिज्य आणि कै. त्रि. प. केळकर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाङ्मय मंडळ उद्घाटनाचे. याप्रसंगी मंचावर दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा अॅड. सुमिता भावे, कार्याध्यक्षा दाक्षायणी बोपर्डीकर, संस्थेचे सचिव राजीव गोगटे, शाळेचे मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी, पर्यवेक्षिका नेहा शेट्ये वाड्म़य मंडळ अध्यक्ष विजय गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. फाटक हायस्कूलचे संस्थापक आदरणीय पुरुषोत्तम वासुदेव फाटक तथा फाटक गुरुजी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून या शैक्षणिक वर्षातील वाड्म़य मंडळाचे उद्घाटन संपन्न झाले. वाड्मय मंडळाच्या माध्यमातून साहित्यविषयक कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू प्रास्ताविकातून मुख्याध्यापक राजन कीर यांनी मांडला. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुमिता भावे यांनी केले. शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या स्वरचित काव्यवाचन, अभिवाचन, कथाकथनाने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.
याप्रसंगी लाइन्स क्लबचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मोहन बापट आणि योगेश मोरबाळे यांना शाळा व संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले. कार्याध्यक्षा दाक्षायणी बोपर्डीकर यांनी वांड्म़य मंडळाच्या स्थापनेमागील भूमिका स्पष्ट केली. प्रमुख पाहुणे माधव अंकलगे यांनी आपल्या मनोगतातून थोर लेखक कवींचा लेखन प्रवासाची सुरुवात वाचनातून झाली असून स्वातंत्र्यपूर्वकाळात लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी साहित्यातूनच क्रांती घडविली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उपक्रमशील बनवलं पाहिजे. परीक्षेतील गुणांपेक्षा कौशल्य विकास आणि कृतिशील शिक्षणावर भर द्यावा हे सांगतानाच सध्याच्या सामाजिक वास्तवावर भाष्य केले. सुमिता भावे यांनी वांड्म़य मंडळाच्या उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या. उपस्थितांचे आभार अनिल अग्रे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुक्ता जोशी आणि मुक्ता बापट या विद्यार्थिनींनी केले.