रस्त्याच्या रखडलेल्या कामाविरोधात मांगेलीत ग्रामपंचायत सदस्याचे बेमुदत उपोषण

दोडामार्ग: सुहास देसाई

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मांगेली गावात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. रखडलेले काम आणि वाढते अपघात यांच्या निषेधार्थ मांगेली ग्रामपंचायत सदस्य सुनील राजाराम गवस यांनी सोमवारपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
माजी शिक्षणमंत्री तथा

​आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून खोक्रल धार ते मांगेली सातेरी मंदिर या ६.५ कि.मी. अंतराच्या रस्त्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराने देऊळवाडी ते कुसगेवाडी दरम्यानचा चांगल्या स्थितीत असलेला सुमारे ३ कि.मी.चा रस्ता खोदून ठेवला आहे. रस्ता उखडल्यामुळे तो वाहतुकीस अत्यंत धोकादायक बनला असून येथे छोटे-मोठे अपघात नित्याचेच बनले आहे

​हा उखडलेला रस्ता तात्काळ पूर्ववत करून वाहतुकीसाठी सुरक्षित करावा.
​ रस्ता रुंदीकरणासाठी वापरण्यात आलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याचा संशय असून, त्याची सखोल चौकशी व्हावी.
​जलजीवन मिशन अंतर्गत कुसगेवाडी व देऊळवाडी येथील गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली पाणी योजना त्वरित पूर्ण करावी.
​ खोक्रल–मांगेली–कुसगेवाडी–देऊवाडी भागातील वीज पोल उभारणीचे थांबलेले काम पुन्हा सुरू करावे.
​​मांगेली हा भाग डोंगराळ आणि घाट रस्ते असलेला भाग आहे. पावसाळ्यात येथे वारंवार दरडी कोसळण्याचे प्रकार घडतात. अशातच मुख्य रस्ता खोदून ठेवल्यामुळे विद्यार्थी, चाकरमानी आणि रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. वारंवार निवेदन देऊनही संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर सुनील गवस यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
​”जोपर्यंत प्रशासनाकडून मागण्यांची दखल घेतली जात नाही आणि कामाला गती मिळत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही.”
— सुनील गवस (ग्रा.पं. सदस्य, मांगेली)
​या उपोषणाला स्थानिक ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शविला आहे. आता प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.