मराठी संस्कृती पुढे नेण्यासाठी योगदान देऊ : नगराध्यक्षा श्रद्धा सावंत -भोसले 

सावंतवाडी । प्रतिनिधी :

सावंतवाडी शहरात जिल्हास्तरीय साहित्य संमेलन होत आहे याचा निश्चितच आनंद आहे. मराठी संस्कृती पुढे नेण्यासाठी तसेच कला व संस्कृती पुढे नेण्यासाठी आपण नगराध्यक्ष या नात्याने निश्चितच योगदान देऊ, अशी ग्वाही सावंतवाडीच्या नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ अनुदानित आणि श्रीराम वाचन मंदिर,सावंतवाडी आयोजित पहिले सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या कविवर्य केशवसुत साहित्य नगरीत आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर स्वागताध्यक्ष प्रा. प्रवीण बांदेकर, माजी शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्षा श्रद्धाराजे सावंत-भोसले, अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुलकर्णी, कोल्हापूरचे सहाय्यक शिक्षण उपसंचालक डॉ. गणपती कमळकर, श्रीराम वाचन मंदिरचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष ऍड. संदीप निंबाळकर, सचिव रमेश बोंद्रे, सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडलाचे अध्यक्ष विक्रांत सावंत, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य शेखर सामंत, भरत गावडे,, विठ्ठल कदम, विश्वकोष मंडळाच्या सदस्या डॉ. शरयू आसोलकर, म. ल. देसाई आदी उपस्थित होते.

स्वागताध्यक्ष प्रा. प्रवीण बांदेकर यांनी कोकणातील साहित्यिक परंपरांचा आढावा घेतला. साहित्य संमेलनानिमित्त आयोजित आ. सो. शेवरे ग्रंथदालन उद्घाटन आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. तर व्यासपीठाला माजी आमदार जयानंद मठकर यांचे नाव देण्यात आले होते. संमेलनानिमित्त आयोजित विविध स्पर्धोंचे बक्षीस वितरणही यावेळी करण्यात आले.

संमेलनानिमित्त विठ्ठल गावकर-दशावतार, सुरेश रणसिंग-कठसुत्री बाहुल्या, गणपत परब-लोकगीते, विजयालक्ष्मी भोसले-शिक्षण, डॉ. अशोक सुर्वे-वैद्यकीय, संजीवनी देसाई-पत्रकारिता, प्रभाकर भागवत-साहित्य, आनंद देवळी-ग्रंथालय, अनिल हळदिवे-क्रीडा, महादेव परब-उद्योग, सुरेश ठाकुर-कथामाला, उदय पंडित- सांस्कृतिक या ज्येष्ठां सत्कार करण्यात आला. तर युवा प्रेरणा पुरस्काराने रवी जाधव-समाजकार्य, प्रमोद दळवी-शेती, अक्षय सावंत-कला, पूजा सावंत-उद्योग, मेगल डिसोजा-पर्यावरण यांचा गौरव करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानधन, स्मृतिचिन्ह आणि पुस्तक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्येष्ठ लेखिका उषा परब यांच्या पुस्तकाचे प्रकाशन तसेच वैनतेय वार्षिक अंकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. अरुण पणदूरकर यांनी केले. तर पुरस्कार वाचन विजय ठाकर यांनी केले.

उपस्थित मान्यवरांचे स्वागत डॉ. जी. ए. बुवा, राजेश मोंडकर, रमेश बोंद्रे, ऍड. संदीप निंबाळकर, बाळ बोर्डेकर यांनी केले. यावेळी संमेलन आयोजन समितिच्या डॉ. सुमेधा नाईक, सखी पवार, शालिनी मोहळ, स्मिता खानोलकर, श्वेतल परब, मनोहर परब, किशोर वालावलकर, विनया बाड आदी उपस्थित होते. आभार रमेश बोंद्रे यांनी मानले.