कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खलिल मणेर यांचा घरचा आहेर
लांजा (प्रतिनिधी) नुकत्याच झालेल्या लांजा नगर पंचायतीच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला भोपळाही फोडता आलेला नाही. त्यामुळे या पराभवाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करावे, अशा शब्दात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते खलिल मणेर यांनी घरचा आहेर दिला आहे.
नुकत्याच झालेल्या लांजा नगर पंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे गेलेल्या कॉंग्रेसने चार उमेदवार रिंगणात उतरवले होते.मात्र एकाही उमेदवाराला विजय मिळवता आला नाही. काँग्रेसला या निवडणुकीत भोपळाही फोडता आलेला नाही. या निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे.
या पार्श्वभूमीवर बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खलील मणेर म्हणाले की, एकेकाळी लांजा शहरात काँग्रेस पक्षाचे सर्वच निवडणुकीत वर्चस्व होते. मात्र आज पक्षाची पूरती वाताहत झाली आहे. नगरपंचायत निवडणुकीत पक्षाला एकही जागा मिळू नये ही शोकांतिका आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतर काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत तरी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोर लावावा. विजय संपादन करावा. लोकांच्या उपयोगी पडावे. कार्यकर्त्यांनी जोराने कामाला लागावे. गद्दारी करू नये एकजूट दाखवावी, असे आवाहन खलिल मणेर यांनी केले आहे.
भविष्यात काँग्रेस पक्षाला जर ऊर्जितावस्था आणावयाची असेल तर काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तळागाळातील जनतेची कामे करा. त्यांच्याशी हितगुज साधावे. लोकांच्या उपयोगीला पडावे. पक्षाशी गद्दारी करून काहीही साध्य होणार नाही. उलट पक्षी पक्ष आणखीनच रसातळाला जाईल.
त्यामुळे भविष्यात पुन्हा एकदा लांजा शहरात आणि तालुक्यात काँग्रेस पक्षाला नव संजीवनी प्राप्त करून देण्यासाठी काँग्रेसच्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन शेवटी खलील मणेर यांनी केले आहे.












