खेड (प्रतिनिधी) – खेड शहरातील नागरिकांसाठी दैनंदिन गरजांची विश्वासार्ह ओळख बनलेला ‘आपला बाजार’ आता नवीन दालनात स्थलांतरित होत असून या निमित्ताने भव्य शुभारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता शुभारंभाचा कार्यक्रम पार पडणार असून या सोहळ्यानिमित्त श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे.
आपला बाजार व्यवस्थापनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक तसेच सहकार क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. माजी मंत्री तथा माजी विरोधी पक्षनेते रामदासभाई कदम, गृह राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य योगेशदादा रामदास कदम, माजी आमदार संजय राव कदम, माजी आमदार व ‘आपला बाजार’चे संस्थापक माननीय मानसिंगराव (भाऊ) नाईक, माजी नगराध्यक्ष व भाजप नेते वैभवजी खेडेकर, खेड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. माधवीताई बुटाला यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
नवीन दालनात स्थलांतरित होणाऱ्या ‘आपला बाजार’मुळे खेड शहर व परिसरातील ग्राहकांना अधिक सुविधा, प्रशस्त जागा आणि उत्तम सेवा उपलब्ध होणार आहे. सहकाराच्या माध्यमातून दर्जेदार व परवडणाऱ्या दरात वस्तू उपलब्ध करून देण्याचा ‘आपला बाजार’चा उद्देश या नवीन दालनातून अधिक प्रभावीपणे साध्य होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
या शुभारंभ सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘आपला बाजार’ परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे. हा कार्यक्रम खेड-भराणा रोडवरील पंचायत समिती समोर असलेल्या ‘आपला बाजार’च्या नवीन दालनात पार पडणार आहे.










