खेड : रत्नागिरी जिल्हा परिषद पुरस्कृत हिवाळी क्रीडा स्पर्धा तिसंगी आपटा कोंड केंद्रांतर्गत बिजघर नंबर १ शाळेत उत्साहात संपन्न झाल्या. सात शाळांनी सहभाग नोंदविलेल्या या स्पर्धांना विद्यार्थ्यांसह स्थानिक ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पदक विजेते निवृत्त पोलीस अधिकारी विश्वासराव भोसले होते. प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन नेव्हीतून निवृत्त राजेंद्र भोसले, निवृत्त कॅप्टन राजारामराव भोसले, पोलीस दलातून निवृत्त नारायणराव भोसले, निवृत्त पोलीस अधिकारी कृष्णाजी भोसले, सरपंच शुभांगी भोसले, उपसरपंच सखाराम जाधव, पोलीस पाटील प्राची मर्चंडे, खोपी प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी सुनील वरेकर, सामाजिक कार्यकर्ते मंगेश मर्चंडे, ग्राहक पंचायत खेडचे अध्यक्ष विजय येरुणकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भगवान जंगम, शिक्षणप्रेमी विश्वास मर्चंडे, सामाजिक कार्यकर्ते कमलेश भोसले, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष काशीराम सुर्वे, विजय भोसले, वैशाली भोसले, राजश्री राजेंद्र भोसले तसेच तिसंगी केंद्राचे केंद्रप्रमुख महेंद्र जाधव उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली.
या स्पर्धांचे आयोजन सुरळीत पार पाडण्यासाठी मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर यांच्यासह शिक्षक विजय सकपाळ, संदीप घाणेकर, शैलेश पराडकर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य आणि बिजघर ग्रामस्थ बंधू-भगिनींनी परिश्रम घेतले. अंतिम निकालांमध्ये बिजघर नंबर १ शाळेने सर्वसाधारण विजेतेपद पटकावत उत्तुंग यशाची नोंद केली. विविध क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी दाखवलेली खेळीमेळीची भावना आणि कौशल्यपूर्ण कामगिरी कौतुकास पात्र ठरली. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभाव, संघभावना आणि आरोग्याचे महत्त्व अधोरेखित झाले असल्याचे आयोजन समितीने सांगितले.












