देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या विषय समिती सभापतीपदाच्या निवडीची प्रक्रिया पार पडली असून सर्व पदांसाठी अर्ज बिनविरोध आल्याने निवडी निश्चित झाल्या. तीन विषय समितींच्या सभापतीपदांसह महिला व बालकल्याण समितीच्या उपाध्यक्षपदासाठीही एकमेव अर्ज दाखल झाल्याने सर्व निवडी बिनविरोध झाल्या.
यामध्ये बांधकाम समितीच्या सभापतीपदी रोहन खेडेकर, पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी तन्वी चांदोस्कर, तर स्वच्छता समितीच्या सभापतीपदी निवृत्ती उर्फ बुवा तारी यांची निवड झाली. तसेच महिला व बालकल्याण समितीच्या उपाध्यक्षपदी मनीषा जामसंडेकर यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.
दुपारी दोन वाजता निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी अधिकृतरित्या निवडीची घोषणा केली. सर्व पदांसाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने कोणतीही निवडणूक न होता बिनविरोध निवडी झाल्याचे स्पष्ट झाले.
नगरपंचायतीतील नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांकडून शहराच्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.










