जागतिक योगासन स्पर्धेतील सुवर्णयशानंतर तन्वी रेडीजचा भाजप नेत्यांकडून सत्कार

खेड (प्रतिनिधी) : लोटेमाळ येथील गुणवंत आणि मेहनती खेळाडू कु. तन्वी चैताली भूषण रेडीज हिने गुजरातमधील अहमदाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत वैयक्तिक तसेच सांघिक गटात सुवर्णपदक पटकावून विश्वविजेती होण्याचा मान मिळवला आहे. तिच्या या अभूतपूर्व यशाबद्दल भाजपा विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार आणि भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांनी तिच्या निवासस्थानी भेट देऊन विशेष सत्कार केला.

यावेळी आमदार प्रमोद जठार आणि ॲड. वैभव खेडेकर यांनी तन्वीला शाल व पुष्पगुच्छ देऊन तिचे अभिनंदन केले. तिच्या यशाचे कौतुक करताना त्यांनी सांगितले की, तन्वीचे हे यश केवळ सुवर्णपदकांपुरते मर्यादित नसून कठोर परिश्रम, शिस्त, सातत्य आणि आत्मविश्वास यांच्या बळावर मिळालेल्या यशाचे जिवंत उदाहरण आहे. खेळाच्या मैदानावरील विजय हा एका दिवसाचा परिणाम नसून त्यामागे अनेक वर्षांची मेहनत, त्याग आणि संघर्ष दडलेला असतो. तन्वीने आपल्या कर्तृत्वातून हे सिद्ध केले आहे की, ध्येय निश्चित असेल आणि प्रयत्न प्रामाणिक असतील तर यशाला कोणतीही सीमा राहत नाही.

तन्वीच्या या सुवर्ण कामगिरीमुळे केवळ रत्नागिरी जिल्ह्याचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा गौरव जागतिक स्तरावर उंचावला असल्याचे त्यांनी नमूद केले. तिच्या यशामुळे आजच्या तरुण पिढीसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला असून विशेषतः मुलींना आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी नवी दिशा मिळाली आहे, असेही त्यांनी सांगितले.
यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचल्यानंतरही नम्रता, सातत्य आणि शिकण्याची वृत्ती कायम ठेवणे हे खऱ्या विजेत्याचे वैशिष्ट्य असल्याचे सांगत, पुढील काळातही तन्वीने याच जिद्दीने आणि आत्मविश्वासाने वाटचाल करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. देशाला तिच्याकडून भविष्यात आणखी अनेक सुवर्ण क्षणांची अपेक्षा असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

या सत्कार कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भूषण रेडीज, शुभम गायकवाड, स्वराज गांधी, सौ. चैताली रेडीज, शंतनु रेडीज, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, ओवैस चौगुले, प्रदीप भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तन्वी रेडीजच्या या जागतिक यशाबद्दल सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.