‘मॉन्स्टर’ या लक्षवेधी शिल्पाद्वारे मांडले चिमुकल्यांवरील अत्याचाराचे वास्तव
सावंतवाडी । प्रतिनिधी : मुंबईच्या प्रतिष्ठित जहांगिर आर्ट गॅलरी येथे आयोजित होणाऱ्या २६ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनासाठी (२०२५-२६) सावंतवाडी तालुक्यातील तुळस येथील नामवंत कलाकार आशिष कुंभार-बांदेकर यांच्या ‘मॉन्स्टर’ या शिल्पाची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
*सामाजिक वास्तवाचे दाहक चित्रण*
आशिष कुंभार यांनी आपल्या ‘मॉन्स्टर’ या कलाकृतीतून अत्यंत संवेदनशील आणि ज्वलंत अशा ‘लहान मुलींवरील वाढत्या अत्याचाराचा’ मुद्दा मांडला आहे. एका बीजातून नुकतेच कोवळे रोपटे उगवत असताना, त्याभोवती झेपावणारे राक्षसी मानवी हात या शिल्पात दाखवण्यात आले आहेत. समाजातील निरागसता आणि तिला ग्रासणारी विकृती यांचे दर्शन या कलाकृतीतून घडते. त्यांच्या या कल्पकतेचे आणि मांडणीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
*फेब्रुवारीत रंगणार कलादालन*
महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन फेब्रुवारी २०२६ मध्ये जहांगिर आर्ट गॅलरी येथे संपन्न होणार आहे. या प्रदर्शनासाठी संपूर्ण राज्यातून १९ ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत विविध कलाकृती दाखल केल्या जाणार आहेत. त्यातून निवडक आणि दर्जेदार कलाकृतींमध्ये आशिष यांच्या शिल्पाने स्थान मिळवले आहे.
*पुरस्कारांची दैदिप्यमान कारकीर्द*
आशिष कुंभार यांचा कलाप्रवास सातत्याने यशाच्या शिखराकडे जात आहे. ते यापूर्वी २०१८ मध्ये महाराष्ट्र राज्य कला पुरस्काराने सन्मानित झाले असून २०१९ ला आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. तर २०२० मध्ये बॉम्बे आर्ट ऑल इंडिया स्पर्धेत त्यांच्या कलाकृतीची निवड झाली होती.
सातत्यपूर्ण कामगिरी आणि सामाजिक भान जपणारी कला यामुळे आशिष कुंभार यांनी चित्रकला आणि शिल्पकला क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.











