कुणकेरी शाळेत कै. ॲड. श्रीधर पराडकर यांच्या स्मरणार्थ भेटवस्तूंचे वाटप
सावंतवाडी | प्रतिनिधी : विद्यार्थ्यांनी नकारात्मक विचारांचा त्याग करून सकारात्मकतेची कास धरल्यास शरीरात नवी ऊर्जा निर्माण होते. याच ऊर्जेतून सकारात्मक कार्य घडते आणि यशाची शिखरे गाठण्याची संधी मिळते, असे प्रतिपादन ‘कोकण लाईव्ह ब्रेकिंग’चे संपादक तथा सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांनी केले.
कुणकेरी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक १ येथे विशेष सरकारी वकील कै. ॲड. श्रीधर पराडकर यांच्या स्मरणार्थ शाळेला भेटवस्तू देण्यात आल्या. सामाजिक कार्यकर्ते व कोकण प्रांत रिक्षा संघटनेचे सचिव सुधीर पराडकर यांनी या वस्तू भेट दिल्या. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात श्री. गावडे बोलत होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गावडे पुढे म्हणाले की, “आई-वडील हेच आपले पहिले गुरु आहेत. त्यांच्या चरणांचे दर्शन घेतल्यास मिळणाऱ्या सकारात्मक ऊर्जेमुळे अशक्य गोष्टीही शक्य होतात. ज्या आई-वडिलांनी हे जग दाखवले, त्यांच्या डोळ्यात कधीही दुःखाचे अश्रू येणार नाहीत याची दक्षता घ्या. आई-वडिलांना सुख दिल्यास प्रगतीचे मार्ग आपोआप मोकळे होतात.” जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर विद्यार्थ्यांनी आपले भविष्य उज्ज्वल करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी सुधीर पराडकर यांनी आपल्या भावाच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवण्याचा संकल्प व्यक्त केला. गरजवंतांच्या मदतीसाठी पराडकर कुटुंब नेहमीच तत्पर राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. मुख्याध्यापक कदम यांनी शाळेच्या यशाचा आढावा घेतला, तर देवस्थान समितीचे अध्यक्ष सूर्यकांत सावंत यांनी गावाचे महत्त्व विषद केले. या कार्यक्रमाला शिक्षक श्री. वैज, सौ. वैज, सौ. घोलप, श्री. डेगवेकर व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार प्रदर्शन शिक्षक डेगवेकर यांनी केले.











