पर्यावरण रक्षणासाठी कोलझरवासीय एकवटले

 ‘दिल्ली लॉबी’विरुद्ध पुकारला एल्गार

ग्रामदैवतासमोर जमीन न विकण्याची शपथ

 इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये अवैध उत्खनन व वृक्षतोड केल्याने संताप

दोडामार्ग । प्रतिनिधी : तालुक्यातील इको सेन्सेटिव्ह एरियामध्ये (ESA) समाविष्ट असलेल्या कोलझर येथील पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी संपूर्ण गावाने ‘दिल्ली लॉबी’ विरुद्ध एल्गार पुकारला आहे. गावच्या जमिनी बाहेरच्या व्यक्तींना विकायच्या नाहीत आणि पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्यांना कायदेशीर धडा शिकवायचा, असा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. या लढ्यात तरुणांचा सहभाग लक्षणीय असून, ग्रामदैवत श्री देवी माऊलीसमोर तशी शपथच ग्रामस्थांनी घेतली आहे.

केंद्राच्या अधिसूचनेनुसार कोलझर हे गाव इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये येते. २०१८ पासून येथे वृक्षतोड बंदी लागू आहे. असे असतानाही, गेल्या आठवड्यात दिल्ली लॉबीशी संबंधित काही व्यक्तींनी स्थानिक जमीन मालकांना अंधारात ठेवून ख्रिश्चनवाडी ते शिरवल न्हयखोलपर्यंत सुमारे ४ किलोमीटर लांबीचे आणि १२ फूट रुंदीचे रस्तासदृश्य अवैध उत्खनन केले. घनदाट जंगलात खनिजयुक्त मातीचे उत्खनन करून ती चोरून नेल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

ग्रामदैवतासमोर वज्रनिर्धार

या अतिक्रमणाविरोधात रविवारी (ता. ११) गावच्या मंदिरात मोठी बैठक पार पडली. यावेळी देवस्थानचे मानकरी व ग्रामस्थांनी श्री देवी माऊलीला नारळ ठेवून, “पूर्वजांचा ठेवा असलेल्या जमिनी रक्ताच्या नात्याबाहेर विकणार नाही,” अशी शपथ घेतली. गावातील जैवविविधता, कृषी व्यवस्था आणि वाघांचा कॉरिडॉर अबाधित राखण्यासाठी ग्रामस्थांनी हे पाऊल उचलले आहे.

*जमीन एजंटांना दिला इशारा*

परिसरात जमिनीचे व्यवहार करणाऱ्या एजंटांना ग्रामस्थांनी बोलावून घेतले. “आम्हाला गावचा नैसर्गिक ठेवा विकायचा नाही, त्यामुळे अशा व्यवहारात कुणीही पडू नये,” अशी स्पष्ट विनंती करण्यात आली. सासोली गावातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा दाखला देत, कोलझरबाबत असा प्रकार घडल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.

*महसूल पथकाकडून पंचनामा*

ग्रामस्थांनी आवाज उठवल्यानंतर आज सोमवारी दोडामार्ग महसूल विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी उत्खननाची मोजमापे घेऊन कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या ग्रामस्थांनी, “येथे कोणताही रस्ता अस्तित्वात नसताना झाडे तोडून पुरावे नष्ट करणाऱ्यांवर तातडीने फौजदारी कारवाई करावी,” अशी मागणी केली.

या बैठकीत शामराव देसाई, आपा देसाई, गुरूदास देसाई, शरद देसाई, पी. पी. देसाई, दीपक देसाई, मुरारी मुंगी, सुदेश देसाई, यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

 

महत्त्वाचे मुद्दे :

अवैध रस्ता : ख्रिश्चनवाडी ते न्हयखोलपर्यंत ४ किमीचे उत्खनन

 

पर्यावरणाचा धोका : पट्टेरी वाघ आणि दुर्मिळ वन्यजीवांचा अधिवास संकटात.

 

झाडांची कत्तल : वृक्षतोडीचा पुरावा नष्ट करण्यासाठी झाडे मुळासकट गायब केल्याचा आरोप.