दोडामार्ग तालुक्यात वनविभागाचे दुर्लक्ष; कोलझर वृक्षतोड प्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल!

तिलारी खोऱ्यातही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण; ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे वनविभागाला जाग

दोडामार्ग (प्रतिनिधी):पर्यावरणदृष्ट्या अत्यंत संवेदनशील (Eco-Sensitive Zone) असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील कोलझर परिसरात बेकायदेशीर वृक्षतोड आणि उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध वनविभागाने अखेर कारवाई केली आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण झाला आहे. मात्र, दुसरीकडे तिलारी खोऱ्यात सुरू असलेल्या वृक्षतोडीकडे वनविभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत असून, तालुक्यात उलटसुलट चर्चा रंगली आहे.

 

कोलझर येथील डोंगराळ भागात अज्ञात व्यक्तींनी खासगी जंगलक्षेत्रात घुसखोरी करून सुमारे ४ किलोमीटर लांबीचे उत्खनन केले होते. केंद्र सरकारने हा भाग ‘इको-सेन्सिटिव्ह झोन’ म्हणून घोषित केलेला असतानाही, नियमांची पायमल्ली करत मोठ्या प्रमाणावर जंगली झाडे मुळासकट तोडून त्यांची चोरी करण्यात आली. विशेष म्हणजे, इतक्या मोठ्या प्रमाणावर काम सुरू असताना वनविभागाला याची पुसटशी कल्पनाही नसावी, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ग्रामस्थांची सजगता ठरली मोलाची

स्थानिक ग्रामस्थांच्या मालकीच्या क्षेत्रात हा प्रकार घडत असल्याचे लक्षात येताच त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. ग्रामस्थांच्या या सतर्कतेमुळेच वनविभागाला घटनास्थळी धाव घेऊन कारवाई करणे भाग पडले.

तिलारी खोऱ्यातील स्थिती भयावह

एकीकडे कोलझरमध्ये कारवाईचा बनाव केला जात असताना, तिलारी खोऱ्यात शेकडो एकर वन जमिनीवर अतिक्रमण करून वृक्षतोड केली जात आहे.

सर्वसामान्य शेतकऱ्याने एखादे झाड तोडल्यास त्वरित कारवाई करणारा वनविभाग, परप्रांतीय भूमाफिया आणि मोठ्या व्यावसायिकांना पाठीशी घालत असल्याची चर्चा आहे.

तालुक्यात राजरोसपणे अवैध लाकूड व्यवसाय सुरूआहे

 

 

सध्या कोलझर आणि तिलारी प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण?

 

कोलझर येथे खाजगी जगलात तोडलेली झाडे नक्की कोठे नेली? याचा सखोल तपास वनविभागाकडून केला जात आहे. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष देऊन दोषी कर्मचाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.