राजापूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी महाविकास आघाडीचे विनय गुरव यांची बिनविरोध निवड

स्विकृत नगरसेवकपदी महेश शिवलकर व सुभाष बाकाळकर यांची निवड

राजापूर प्रतिनिधी :येथील नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदासाठी मंगळवारी झालेल्या निवडणूकीत महाविकास आघाडीचे शिवसेना उबाठाचे नगरसेवक विनय गुरव यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. तर स्विकृत नगरसेवकपदी महाविकास आघाडीकडून पत्रकार महेश शिवलकर यांची तर शिवसेना गटाकडून माजी नगरसेवक सुभाष बाकाळकर यांची निवड झाली आहे.
राजापूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदासाठी व स्विकृत नगरसेवक पदासाठी मंगळवारी नगराध्यक्षा एड. हुस्नबानू खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी अभिजीत कुंभार व कार्यालय अधिक्षक जितेंद्र जाधव यांच्या उपस्थितीत बॅ. नाथ पै सभागृहात निवडणूक प्रक्रिया पार पडली.
उपनगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठाचे नगरसेवक विनय गुरव यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची या पदी बिनविरोध निवड झाल्याचे नगराध्यक्षा एड. खलिफे यांनी जाहिर केले.
याप्रसंगी नगराध्यक्षा एड. खलिफे यांनी गुरव यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर सर्व नवनिर्वाचिन नगरसेवकांना शुभेच्छा देताना त्यांनी भविष्यात सगळयांनी एकसंघपणे राजापूर शहराच्या विकासासाठी काम करूया असे आवाहनही केले.
याप्रसंगी महाविकास आघाडीचे गटनेते एड. जमिर खलिफे, नगरसेवक सौरभ पवार, शिवसेना गटनेते एड. राहुल तांबे, नगरसेवक सौरभ खडपे यांनी मनोगत व्यक्त करून उपनगराध्यक्षांना शुभेच्छा दिल्या. तर नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचे अभिनंदन केले.
यानंतर झालेल्या स्विकृत नगरसेवक पदाच्या निवडीत महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ पत्रकार महेश शिवलकर, व शिवसेना गटाकडून माजी नगरसेवक सुभाष बाकाळकर यांच्या नावाचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. यावर नगराध्यक्षा एड. खलिफे यांनी हे दोन्ही प्रस्ताव वैध असून या दोघांचीही स्विकृत नगरसेवकपदी निवड करण्यात येत असल्याचे जाहिर केले.
यानंतर नगराध्यक्षांसह उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी यांनी शिवलकर व बाकाळकर यांचे अभिनंदन केले. दोन्ही गटनेत्यांनीही या दोघांचे अभिनंदन केले.
विनय गुरव यांची उपनगराध्यक्षदी निवड झाल्यानंतर नगराध्यक्षा एड. खलिफे यांनी त्यांना उपनगराध्यक्षांच्या दालनात नेऊन आसनावर बसविले. यानंतर शिवसेना उबाठा गटाकडून माजी आमदार गणपत कदम यांसह काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जितेंद्र खामकर, तालुका प्रमुख कमलाकर कदम, शहर प्रमुख संजय पवार यांसह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. तर गुरव यांच्या प्रभागातील नागरिक, महिलांनीही गुरव यांचे अभिनंदन केले.
यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने जवाहर चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या निवडीनंतर जवाहर चौकात जोरदार फटाकेबाजी करत आनंद साजरा करण्यात आला.