वारजे माळवाडीत पोलिसांची थट्टा; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

मतदान केंद्राजवळ पोलिसांशी अश्लील हावभाव

वारजे पोलिसांकडून नोटीस बजावून कारवाई

वारजे माळवाडी परिसरात मतदान केंद्राजवळ गस्तीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची थट्टा करत अश्लील हावभाव केल्याचा प्रकार समोर आला आहे. गुरुवारी दुपारी तीन तरुणांनी पोलिसांच्या कामात अडथळा आणत आरडाओरडा केला. मतदान केंद्र परिसरात फिरण्यास मज्जाव केल्यावरही त्यांनी पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. या प्रकारामुळे निवडणूक काळातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. अखेर वारजे पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करत त्यांना नोटीस बजावली.


पुणे : वारजे माळवाडी येथील तीन तरुणांनी गुरुवारी दुपारी ३.२० च्या सुमारास वारजे येथील पंडित जवाहरलाल नेहरू शाळेजवळ गस्तीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची अश्लील हावभाव करून थट्टा केल्याची घटना घडली. तसेच मतदान केंद्र परिसरात जाण्यास पोलिस पथकाला मज्जाव करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला.

या प्रकरणी वारजे पोलिसांनी संबंधित तिघांविरुद्ध अश्लील कृत्य तसेच पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांना पोलीस ठाण्यात नेल्यानंतर नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली.

एफआयआरनुसार, गस्तीवर असलेल्या पोलिस पथकाने मतदान केंद्र असलेल्या शाळेभोवती फेऱ्या मारत असताना पोलिसांना पाहून तिघांनी आरडाओरडा सुरू केला. कोणतेही कारण नसताना त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांकडे अश्लील हावभाव करण्यास सुरुवात केली आणि पोलिस आमचे काहीही करू शकत नाहीत, असा दावा केला.

आपण स्थानिक रहिवासी असल्याने मतदान केंद्राच्या परिसरात कुठेही फिरू शकतो, असा दावा करत त्यांनी पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. पोलिसांनी त्यांच्या अयोग्य वर्तणुकीवर आक्षेप घेत मतदान केंद्र परिसरातून निघून जाण्याचे आदेश दिले असतानाही त्यांनी ते पाळले नाहीत. अखेर कायदेशीर कारवाई करत पोलिसांनी पुढील कार्यवाही केली.