शिरगांव येथील ओम गणेश मंदिराचा ९ वा वर्धापनदिन व गणेश जयंती उत्सव

२१ व २२ जानेवारी रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम

शिरगांव (प्रतिनिधी): देवगड तालुक्यातील शिरगांव बाजारपेठ येथील ओम गणेश मंदिराचा ९ वा वर्धापनदिन सोहळा तसेच माघी गणेश जयंती उत्सव २१ व २२ जानेवारी रोजी पारंपरिक रीतीरिवाजाप्रमाणे साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने दोन दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक व स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार, २१ जानेवारी रोजी मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त सकाळी ७.३० वाजता श्रींची पूजा व सहस्रनाम जप, सकाळी १०.३० वाजता महाआरती व तीर्थप्रसाद होणार आहे. सकाळी ११.३० वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

सायंकाळी ४ वाजता बोर्डवे येथील गवळदेव फुगडी मंडळ व कुडाळ येथील देव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ यांचा फुगडी जुगलबंदीचा कार्यक्रम होणार आहे. रात्री ७.३० वाजता आरती, तर रात्री ८ वाजता हरिपाठाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार, २२ जानेवारी रोजी गणेश जयंतीनिमित्त सकाळी ७.३० वाजता श्रींची पूजा व मूर्ती अभिषेक, सकाळी ८ वाजता वैयक्तिक अभिषेक होईल. सकाळी ९ वाजता शालेय विद्यार्थ्यांसाठी गणेशस्तोत्र व मंगळपुष्पांजली गायन स्पर्धा घेण्यात येणार आहे.
दुपारी १२ वाजता महाआरती व दुपारी १ वाजता महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ४ वाजता स्थानिक सुस्वर भजने, सायंकाळी ७ वाजता महाआरती, रात्री ९ वाजता लकी देणगी कुपन सोडत आणि रात्री १० वाजता सावंतवाडी–निगुडे येथील श्री देव विघ्नहर्ता रामेश्वर दशावतारी मंडळाचा ‘भक्ती महिमा’ हा पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे.
या सर्व कार्यक्रमांना गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन ओम गणेश मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.