वेंगुर्ले | प्रतिनिधी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला वेंगुर्ला तालुक्यात मोठा धक्का बसला असून पक्षाचे तालुका प्रमुख श्री. यशवंत सुभाष उर्फ बाळू परब तसेच युवासेनेचे तालुका प्रमुख पंकज विनायक शिरसाट यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत.
श्री. यशवंत उर्फ बाळू परब यांनी जिल्हाप्रमुख बाबूराव घुरी यांच्याकडे सादर केलेल्या राजीनामा पत्रात, आपण गेली सहा वर्षे शिवसेनेचे तालुका प्रमुख म्हणून काम करत होतो. मात्र वैयक्तिक कारणांमुळे पक्षाच्या कामासाठी आवश्यक वेळ देता येत नसल्याने आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच राजीनामा मंजूर करून पदमुक्त करण्यात यावे, अशी विनंती केली आहे.
तर युवासेनेचे तालुका प्रमुख पंकज विनायक शिरसाट यांनीही युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे. गेली दहा वर्षे वेंगुर्ला तालुक्यात युवासेनेच्या माध्यमातून कार्यरत असताना वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. मात्र वैयक्तिक कारणांमुळे पुढे पक्षकार्याला वेळ देणे शक्य नसल्याने राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
या दोन्ही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे वेंगुर्ला तालुक्यात उबाठा सेनेला संघटनात्मक बांधणीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.













