रत्नागिरीत ‘हिट अँड रन’मध्ये प्रसिद्ध ब्युटिशियन सुनीता साळवी यांचा मृत्यू

माणुसकीला काळिमा फासणारी घटना

रत्नागिरी: रत्नागिरी शहरात रविवारी संध्याकाळी एक अत्यंत भीषण आणि संतापजनक घटना घडली आहे. शहरातील लाला कॉम्प्लेक्स परिसरात झालेल्या एका ‘हिट अँड रन’ अपघातात, रत्नागिरीतील ब्युटी पार्लर व्यावसायिक आणि ‘सहेली ब्युटी पार्लर’च्या संचालिका सौ. सुनीता राजेश साळवी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण शहरात शोककळा पसरली असून संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास सुनीता साळवी लाला कॉम्प्लेक्स परिसरातील रस्त्यावरून जात असताना हा अपघात झाला. साळवी या रस्त्यावर पडल्या असताना, राजीवडा येथील एका तरुणाने आपली भरधाव होंडा सिटी कार त्यांच्या अंगावरून नेली. माणुसकीला काळिमा फासणारी बाब म्हणजे, अपघात झाल्यानंतर जखमीला मदत करण्याऐवजी संबंधित कारचालक घटनास्थळावरून फरार झाला. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात संबंधित संशयित तरुणावर ‘हिट अँड रन’चा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
सौ. सुनीता साळवी या गेल्या ३० वर्षांपासून रत्नागिरीत ब्युटी पार्लर व्यवसायात कार्यरत होत्या. त्यांनी आपल्या कष्टाने आणि जिद्दीने ‘सहेली ब्युटी पार्लर’ हा ब्रँड नावारूपाला आणला होता. शहरात त्यांची दोन पार्लर असून, रत्नागिरीतील पहिल्या ब्युटी पार्लर व्यावसायिक म्हणून त्यांचा मोठा मान होता. अत्यंत नम्र, मितभाषी आणि सर्वांना प्रेमाने वागवणाऱ्या सुनीता साळवी यांच्या जाण्याने त्यांच्या मित्रपरिवारावर आणि व्यावसायिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, सून, नातू आणि मुलगी असा मोठा परिवार आहे.