संगमेश्वर तालुका वार्तापत्र

संगमेश्वर तालुक्यात जि. प. व पं. स. निवडणुकांची रणधुमाळी; राजकीय वातावरण तापू लागले
तालुक्यात १ लाख ५९ हजार ७१३ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

निलेश जाधव / देवरूख

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजताच राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. संगमेश्वर तालुक्यातही जि. प. व पं. स. निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय वातावरण तापू लागले आहे. सर्वच राजकीय
पक्षांनी आपापले बालेकिल्ले राखण्यासाठी आणि विजयाचा गुलाल उधळण्यासाठी कंबर कसली आहे. तर शक्तीप्रदर्शन करत विविध पक्षांच्या उमेदवारांकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला जात आहे. सोमवारी महायुतीतर्फे साडवली जिल्हा परिषद गटासाठी भाजपकडून १ तर साडवली पंचायत समिती गणासाठी महायुतीतर्फे शिवसेना शिंदे गटाकडून १ व निवेबुद्रुक पंचायत समिती गणासाठी महायुतीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून १ असे ३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तालुक्यात आत्तापर्यंत केवळ तीनच उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सोमवारी साडवली जिल्हा परिषद गटासाठी महायुतीतर्फे भाजपकडून सौ. रूपाली रूपेश कदम, साडवली पंचायत समिती गणासाठी महायुतीतर्फे शिवसेना शिंदे गटाकडून सौ. तृप्ती सचिन मांगले व निवेबुद्रुक पंचायत समिती गणासाठी महायुतीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून श्री. प्रफुल्ल बाईत यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरूवात केली आहे. तालुक्यात भाजप- शिवसेना (शिंदे गट)-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या महायुतीने काही ठिकाणी आपले उमेदवार घोषीत केले आहेत. तर काही ठिकाणी महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचे समजते. महाविकास आघाडीने अद्याप आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली नाही. तसेच इतर पक्षांकडून आपल्या उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही.

संगमेश्वर तालुका हा विस्तीर्ण असून तालुक्यात ७ जिल्हा परिषद गट असून १४ पंचायत समिती गण आहेत. तर २३२ मतदान केंद्रे आहेत. १ लाख ५९ हजार ७१३ मतदार आहेत. यामध्ये ७६ हजार ६७ इतके पुरूष मतदार असून ८३ हजार ६५८ महिला मतदार आहेत. नुकतीच देवरूख नगरपंचायतीची निवडणूक पार पडली असून या निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवत नगरपंचायतीवर सत्ता काबीज केली आहे. त्यामुळे महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आनंदात आहेत. हेच वातावरण तालुक्यातील जि. प. व पं. स. निवडणुकीत ठेवण्याचा महायुतीचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मेहनत घेण्याच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून प्राप्त झाल्या आहेत. तर महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आत्तापासून महायुतीच्या विजयासाठी कामाला लागले आहेत. एकंदरीत तालुक्यात जि. प. व पं. स. निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर राजकीय वातावरण ढवळून निघत आहे.