राजापूरात पाचव्या दिवशी दोन पंचायत समिती एका उमेदवाराचे तीन अर्ज दाखल

अर्ज दाखल करण्याचा बुधवार अखेरचा दिवस
राजापूर (वार्ताहर): जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी मंगळवारी एकाच उमेदवाराचे तीन नामनिर्देशपत्र दाखल झाले आहेत.
अपक्ष उमेदवार म्हणून सुनिल मनोहर जठार यांनी पेंडखळे पंचायत समिती गणातून एक व कातळी पंचायत समिती गणातून दोन असे तीन अर्ज दाखल केले आहेत.उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उदयाचा बुधवार हा शेवटचा दिवस असल्याने याच दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी होणार आहे.
१६ जानेवारी पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. मात्र गेल्या चार दिवसात एकही अर्ज दाखल झाला नव्हता. मात्र मंगळवारी एका उमेदवाराने दोन पंचायत समिती गणातून तीन अर्ज दाखल केले आहेत.
दरम्यान आतापर्यंत तब्बल १४५ नामनिर्देशपत्र वितरीत झालेली आहेत. त्यामुळे बुधवार २१ जानेवारी या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतीम दिवशी हा उमेदवारांसाठी आणि प्रशासनासाठी कसोटीचा दिवस ठरणार आहे.
राजापूर तालुक्यात सहा जिल्हा परिषद गट व बारा पंचायत समिती गणांसाठी ही निवडणूक होत आहे. प्राप्त अर्जांची छाननी गुरूवारी २२ रोजी होणार आहे. तर २३, २४ व २७ जानेवारी या दिवशी उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहेत.