देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या कोकण विभागीय कथाकथन स्पर्धेचे २८ नोव्हेंबर रोजी आयोजन

देवरूख (प्रतिनिधी):

देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे- पित्रे कनिष्ठ महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाच्यावतीने संस्थापक सदस्य कै. द. ज. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येणाऱ्या कोकण विभागीय कथाकथन स्पर्धेचे यंदा रौप्यमहोत्सवी वर्ष असून ही स्पर्धा शनिवार दि. २८ नोव्हेंबर, २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता महाविद्यालयाच्या कै. द. ज. कुलकर्णी सभागृह, देवरुख येथे आयोजित केली आहे.

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या शताब्दी महोत्सवी वर्षातील या स्पर्धेसाठी ‘माणूस घडवणाऱ्या कथा’ हा विषय निश्चित करण्यात आला आहे. संघर्ष, प्रतिकूल परिस्थिती, जीवनातील एखादा प्रसंग, अनुभव किंवा जीवनमूल्य यामुळे व्यक्तीच्या जीवनाला मिळालेली नवी दिशा आणि त्यातून घडलेले व्यक्तिमत्त्व यावर आधारित कथा विद्यार्थ्यांना सादर करता येणार आहेत. कोकण विभागीय कथाकथन स्पर्धेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांतील कनिष्ठ महाविद्यालयीन व उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता ११वी व १२वी या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. प्रत्येक स्पर्धकाला कथाकथनासाठी किमान सात व कमाल दहा मिनिटांचा वेळ देण्यात येईल. कथाकथन मराठी भाषेतून करणे आवश्यक आहे.

स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास चार हजार रुपये, द्वितीय क्रमांकास दोन हजार पाचशे रुपये आणि तृतीय क्रमांकास दीड हजार रुपये रोख पारितोषिक, चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी एक हजार रुपये व प्रमाणपत्र अशी असणार आहेत. सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. कथाकथन स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क ₹ १५०/- असून स्पर्धकांनी सकाळी ९:३० वाजता उपस्थित राहून नोंदणी करावी. सहभागी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे ओळखपत्र किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र, तसेच प्राचार्यांचे सहभागाबाबतचे पत्र सोबत आणणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी प्रा. सीमा नितीन शेट्ये (९१४५१००५२३) यांच्याशी संपर्क साधावा. अद्याप ज्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी नाव नोंदणी केलेली नाही, अशा विद्यार्थ्यांना आयोजकांशी संपर्क साधून अजूनही नोंदणी करता येईल. कोकण विभागीय कथाकथन स्पर्धेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी केले आहे.