ज्येष्ठ हार्मोनियम वादक सुरेश मेस्त्री यांचे निधन

तब्बल ४० वर्षांच्या सांगीतिक प्रवासाची अखेर 

सावंतवाडी । प्रतिनिधी :सावंतवाडी परिसरातील ज्येष्ठ हार्मोनियम वादक आणि सांगीतिक क्षेत्रातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व सुरेश मेस्त्री यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी डोंबिवली येथे दुःखद निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाने कोकणातील संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली असून, एका संयमी आणि निष्ठावान कलाकाराला संगीतप्रेमी मुकल्याची भावना व्यक्त होत आहे.

मूळचे सावंतवाडी येथील रहिवासी असलेल्या सुरेश मेस्त्री यांनी संगीताचे प्राथमिक धडे आपले काका कै. रघुनाथ ऊर्फ बाबी मेस्त्री यांच्याकडून गिरवले. व्यवसायाने ते आरोग्य खात्यात सावंतवाडी व ओरोस येथे तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते. सरकारी नोकरी सांभाळून त्यांनी सुमारे ४० वर्षे संगीताची अविरत सेवा केली.

त्यांच्या वादनाचे वैशिष्ट्य म्हणजे शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, सुगम संगीत, भजन आणि कीर्तन अशा सर्वच प्रकारांत त्यांचा हातखंडा होता. ते निव्वळ व्यावसायिक कलाकार म्हणून कधीही वावरले नाहीत, तर कलेप्रती असलेल्या श्रद्धेपोटी त्यांनी आपला प्रवास सुरू ठेवला.

*संस्थात्मक कार्य आणि गुरुपद*

स्वराभिषेक व नाट्यदर्शन: १९९० ते २०१५ या काळात त्यांनी कै. उदय सिद्धये संचालित ‘स्वराभिषेक’ संस्थेच्या अनेक कार्यक्रमांना साथसंगत केली. तसेच कै. दिनकर धारणकर यांच्या ‘नाट्यदर्शन’ संस्थेच्या संगीत नाटकांसाठीही त्यांनी मोलाचे योगदान दिले.

श्री. विजय फातरपेकर दिग्दर्शित ‘लीला गौरीहराच्या’ या गाजलेल्या नृत्यनाट्याच्या अनेक प्रयोगांना त्यांनी हार्मोनियमची साथ दिली होती.

अद्वैत मैत्री: ज्येष्ठ तबलावादक श्री. रमेश ऊर्फ बाबा खोत आणि सुरेश मेस्त्री या जोडीने १९७५ ते २०१५ अशी सलग ४० वर्षे अनेक मैफिली गाजवल्या.

२००३ साली त्यांनी श्री. किरण सिद्धये यांच्यासोबत ‘अभिनव संगीत विद्यालयाची’ स्थापना केली आणि २०१५ पर्यंत तेथे संगीत गुरु म्हणून अनेक शिष्य घडवले.

आपल्या दीर्घ प्रवासात त्यांनी कै. उमेश मेस्त्री, कै. उदय सिद्धये, कै. मधु पास्ते यांसह श्रीपाद चोडणकर, सुनील पाडगावकर आणि किरण सिद्धये यांसारख्या अनेक नामवंत कलाकारांना हार्मोनियमची समर्थ साथ केली. १९९५ ते २०१५ या काळात ‘सावंतवाडी संगीत मित्रमंडळा’चे ते अविभाज्य घटक होते.

सुरेश मेस्त्री यांच्या जाण्याने सावंतवाडीच्या सांस्कृतिक वैभवातील एक महत्त्वाचा दुवा निखळला आहे, अशी भावना संगीतप्रेमींमधून व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन विवाहित मुली आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते सद्‌गुरु संगीत विद्यालयाचे संचालक श्री. निलेश मेस्त्री यांचे चुलत भाऊ होते.