महाप्रसादाने उद्या होणार उत्सवाची सांगता
वेंगुर्ले : दाजी नाईक
वेंगुर्ले गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला. या निमित्त मंदिरात पूजन करण्यात आलेल्या २१ गणपतींचे विसर्जन आज शुक्रवारी सायंकाळी करण्यात आले. उद्या शनिवारी महाप्रसादाने या उत्सवाची सांगता होणार आहे.
सोमवार १९ जानेवारीपासून या मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव कार्यक्रम धार्मिक कार्यक्रमांनी सुरु झाला. गुरुवारी गणेश जयंतीचे औचित्य साधून गणेशयाग संपन्न झाले. यानिमित्त प्राणप्रतिष्ठा केलेल्या गणपतींचे विसर्जन शुक्रवारी सायंकाळी करण्यात आले. यावेळी भक्तांनी गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष केला. शनिवारी महाप्रसादाने या उत्सवाची सांगता होणार आहे. तरी भाविकांनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.











