आ. शेखर निकम यांनी निवड रद्द करण्याची केली मागणी
दापोली | प्रतिनिधी : नाव डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ पण नावात जरी कोकण असलं तरी कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर मात्र कोकणातील प्रगतीशील शेतकऱ्याची निवड करण्यात आली आहे. चक्क कोकणाबाहेरील जळगाव येथील व्यक्तीची प्रगतशील शेतकरी हा निकष लावून नियुक्ती करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर कोकणा बाहेरील व्यक्तिची निवड करत कोकणातल्या प्रगतिशील शेतकऱ्यांना पध्दतशिरपणे डावलले आहे. या सगळ्या प्रकाराबाबत चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी कार्यकारी परिषदेवर कोकणातीलच व्यक्तीची निवड करून कोकणाबाहेरील व्यक्तीची निवड रद्द करावी अशी मागणी केली आहे.
२०१९ मध्येही असाच प्रकार तत्कालीन कृषिमंत्री डॉ.अनिल भोंडे यांनी तर चक्क कोकणाबाहेरील तीन व्यक्तींची निवड कार्यकारी परिषदेवर केली होती. कोकण विभागातील शेतकऱ्यांचा बागातदारांना सातत्याने सापत्नपणाची वागणूक देत डावलले जात असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. व येथील कृषी विद्यापीठ कोकणाच्या भागाचे मात्र कार्यकारी परिषदेवर निवड करण्यासाठी प्रगतशील शेतकरीच नाही का असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर एकूण चौदा अशासकीय नियुक्त सदस्य असतात. त्या सदस्यांचे निकष व ज्यांच्या आदेशाने नियुक्ती होते ती पुढीलप्रमाणे प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ एक- राज्यपाल महोदय,प्रगतिशील शेतकरी पाच -प्रतिकुलपती तथा मंत्री महोदय, कृषी उद्योजक एक- कृषी व पदुम विभाग, विधानसभा सदस्य तीन,विधानपरिषद सदस्य दोन- सभागृह सभापती,विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या जिल्हा परिषद मधील कोणत्याही जि. प.मधील कृषी समिती सभापती दोन-प्रतिकुलपती अशा स्वरूपाचे हे निकष आहेत.
महाराष्ट्र कृषि विद्यापीठ अधिनियम, १९८३ मधील कलम ३००) नील तरतूदीनुसार डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर प्रगतिशील शेतकरी या प्रवर्गातून कुलपति यांनी श्री. राजेश गजानन वानखेडे रा. रावेर, जि. जळगाव यांचे नामनिर्देशन केले आहे. त्यानुसार श्री. राजेश गजानन वानखेडे राहणार चांदणी चौक रावेर जि.जळगाव यांची डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली वा कृषि विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवरील ही नेमणूक पुढील आदेश होईपर्यंत पण जास्तीत जास्त तीन वर्षांचा कालावधी यापैकी जी घटना अगोदर घडेल तोपर्यंत असेल असे आदेश कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय विभागाकडून ७ डिसेंबर रोजी कोकण कृषी विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आले. त्यानंतर १३ डिसेंबर रोजी कृषी विद्यापीठाच्या कुलसचिव कार्यलयाकडून राजेश गजानन वानखेडे राहणार चांदणी चौक रावेर जि.जळगाव यांच्या कार्यकारी परिषदेवरील नियुक्तीची अधिसूचना काढण्यात आली आहे.