फोंडाघाट महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा

फोंडाघाट – येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. स्वच्छ पारदर्शक व निपक्षपाती निवडणुका होण्यासाठी, भारतीय लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टीने मतदारांमध्ये जनजागृती व्हावी, तसेच तरुणांना मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभागासाठी प्रेरित करावे या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बालाजी सुरवसे यांच्या प्रास्ताविकाने झाली. यानंतर श्रीकृष्ण ठाणेकर यांनी उपस्थित विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना मतदानाची प्रतिज्ञा वाचन करून घेतली. यावेळी नितीन पाटील व मनोज गवाणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, मताधिकार हा प्रत्येक नागरिकाचा अत्यंत महत्त्वाचा हक्क असून तो प्रत्येक निवडणुकीत बजावणे आवश्यक आहे. सध्याच्या काळात मतदानाची टक्केवारी घटताना दिसून येत असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी, मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून घरबसल्या मतदार नोंदणी करणे शक्य असल्याचे सांगितले.

मतदानाच्या दिवशी प्रत्येकाने घराबाहेर पडून मतदान करणे गरजेचे असून “माझ्या एका मताने काय फरक पडणार?” अशी मानसिकता टाळावी, कारण एका मतानेही मोठा बदल घडू शकतो, असे त्यांनी ठामपणे सांगितले. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भीडपणे मतदान करावे व लोकशाहीच्या या उत्सवात उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांनी सर्वांना राष्ट्रीय मतदार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी केवळ स्वतः मतदान न करता समाजात जाऊन मतदानाबाबत जनजागृती करावी, लोकशाहीवरील विश्वास अधिक दृढ करावा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. पुढील वर्षापासून ज्या विद्यार्थ्यांचे वय 18 वर्षे पूर्ण झाले असून ज्यांनी मतदार नोंदणी केलेली नाही त्यांची ऍडमिशन वेळीच महाविद्यालयामार्फत मतदार नोंदणी करून घेण्यात येईल असे डॉ. नारे यांनी सांगितले.

 

कार्यक्रमाच्या शेवटी सतीश कामत यांनी आभार मानले.या कार्यक्रमास विजय पाटील, अनिल लाड, वेदांती नारकर ,अमृता दळवी इ BLO तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.