सासोली भरपाल सीमेवर संपवले जीवन; आत्महत्येचे नेमके कारण अस्पष्ट
दोडामार्ग | प्रतिनिधी :साटेली भेडशी येथील बाजारपेठेत आपल्या वडापावच्या चवीने सर्वांचे मन जिंकणारा तरुण व्यावसायिक दीपक विठ्ठल खरवत (वय ३५) याने सासोली भरपाल सीमेवर तिलारी धरणाच्या कालव्यालगत झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, एका उमद्या तरुणाच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
झरे-काजुळ (धनगरवाडी) येथील रहिवासी असलेला दीपक गेल्या अनेक वर्षांपासून साटेली भेडशी येथे ‘शामूचा वडापाव’ या नावाने प्रसिद्ध असलेला स्टॉल चालवत होता. मंगळवारी तो एका कौटुंबिक केसच्या कामासाठी जिल्हा न्यायालयात गेला होता. तिथून परतत असताना त्याच्या गाडीला छोटा अपघात झाला होता. याबाबत त्याने घरी माहितीही दिली होती. नातेवाईक त्याला आणण्यासाठी गेले असता, “मी येतो, तुम्ही निघा,” असे सांगून तो मागे थांबला. मात्र, त्यानंतर तो घरी परतलाच नाही.
मंगळवारी सायंकाळपासून दीपकचा फोन बंद येत होता. रात्री उशिरा फोन सुरू झाला, पण त्याने कोणाचेही फोन उचलले नाहीत. बुधवारी सकाळी शोध घेतला असता, सासोली भरपाल सीमेवरील झाडाला त्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, उजेडासाठी मोबाईल बॅटरीचा वापर करून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
वडापावची ‘ती’ चव आता पोरकी
दीपकचा वडापाव आणि चहा साटेली भेडशी परिसरातील कॉलेज आणि हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसह खवय्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय होता. त्याच्या स्टॉलवर ग्राहकांची नेहमीच गर्दी असायची. अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचा आणि कष्टाळू दीपकने अचानक असे पाऊल का उचलले? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
याबाबत माहिती मिळताच दोडामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अधिक तपास करीत आहेत सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून, त्यानंतर तो नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.











