सावंतवाडीच्या ‘संस्कार नॅशनल स्कूल’चा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न
सावंतवाडी | प्रतिनिधी :
पालकांनी आपल्या मुलांमधील उपजत कलागुण ओळखून त्यांना त्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी पाठबळ दिले पाहिजे. केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित न करता, मुलांच्या आवडीला आणि कलेला योग्य वाव दिल्यास त्यांचा सर्वांगीण विकास निश्चितपणे घडू शकतो, असे प्रतिपादन सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले.
निरवडे येथील दर्शन विद्या एज्युकेशन सोसायटी संचलित संस्कार नॅशनल स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन मध्यप्रदेशचे माजी कॅबिनेट मंत्री तथा विश्व ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष धर्माचार्य योगेंद्र महंतजी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. प्रशालेच्या कार्याचे कौतुक करताना ते म्हणाले, “ग्रामीण भागात इतक्या दर्जेदार सोयी-सुविधा आणि मूल्याधिष्ठित शिक्षण देणे ही कौतुकास्पद बाब आहे. संस्कार नॅशनल स्कूल खऱ्या अर्थाने एक आदर्श शाळा म्हणून नावारूपास येत आहे.”
या सोहळ्यात शैक्षणिक वर्षभरात विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा, तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षक व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. बक्षीस वितरणानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. नृत्याविष्कार आणि नाटिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे दर्शन घडवले.
या सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष डॉ. शेखर जैन, अनंत सोहनी, निरवडेचे माजी सरपंच हरी वारंग, मुख्याध्यापिका प्रणाली रेडकर, पत्रकार सागर चव्हाण, हरिश्चंद्र पवार, चंदन गोसावी, संदेश घाडी (उपाध्यक्ष, पालक शिक्षक समिती), सौ. ऋतुजा मुळीक (उपाध्यक्ष, माता पालक समिती) यांसह अनेक मान्यवर, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापकांनी प्रशालेच्या प्रगतीचा वार्षिक आढावा सादर केला. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन जुहीली पांगम व हर्षदा खवणेकर यांनी केले, तर पांडुरंग मिशाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले. या दिमाखदार सोहळ्यामुळे निरवडे परिसरात शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.












