
कुणकेश्वर जिल्हा परिषद गटातून भाजपचे उमेदवार सुनील बाळकृष्ण पारकर, कुणकेश्वर पंचायत समिती गणातून शिंदे शिवसेनेचे उमेदवार अमोल लोके तसेच मुणगे पंचायत समिती गणातून भाजपचे उमेदवार सदाशिव ओगले हे निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत प्रचार सुरू असून भाजप-शिवसेना महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सर्व शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन उमेदवार देत आहेत. तसेच शासनाच्या योजना प्रत्यक्षात नागरिकांपर्यंत पोहोचल्या आहेत की नाहीत, याची माहितीही ते घेत आहेत. प्रचाराला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून भाजप, शिवसेना, आरपीआय व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे.
केंद्र व राज्यात महायुतीचे सरकार असल्याने तालुका व जिल्हा पातळीवरील प्रश्न सोडविण्याची जबाबदारी आमचीच असल्याचे उमेदवारांनी स्पष्ट केले. यापूर्वीही अनेक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले असून, केंद्र-राज्याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही महायुतीची सत्ता आल्यास विकासकामे अधिक गतीने होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पर्यटन विकासाला नवी उंची देणे, फळ प्रक्रिया उद्योगांना चालना देणे, तरुण व महिलांच्या हाताला स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पूरक उद्योग उभारणे, मच्छीमार व बागायतदार शेतकऱ्यांना बळकटी देणे, पशुपालन, दुग्धोत्पादन व कुक्कुटपालनातून शाश्वत रोजगारनिर्मिती करणे, यासाठी जिल्हा परिषद व जिल्हा बँकेचा प्रभावी वापर करणे, जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षम व स्वयंपूर्ण करणे, तसेच दलित, वंचित, कष्टकरी व सर्वसामान्य घटकांपर्यंत विकास प्रक्रिया पोहोचविण्यासाठी परिपूर्ण जिल्हा विकास आराखडा तयार करणे, प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार अधिक जलद व पारदर्शक करणे, हे उद्दिष्ट निवडणूक जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले आहे.
कुणकेश्वर जिल्हा परिषद गटात एकूण दहा गावे असून त्यामध्ये दोन पंचायत समिती गणांचा समावेश आहे. कुणकेश्वर पंचायत समिती गणात मिठबाव, कुणकेश्वर, कातवणेश्वर, मिठमुंबरी, कातवण व तांबळडेग ही पाच गावे येतात. तर मुणगे पंचायत समिती मतदारसंघात मुणगे, हिंदळे, नारिंग्रे, पोयरे व खुडी अशी एकूण दहा गावे असून, विखुरलेल्या वाड्या-वस्त्यांसह या गटात आहेत. मतदार संघात सुमारे १२ हजार ०६८ इतके मतदान आहे.
कुणकेश्वर पंचायत समितीचे उमेदवार अमोल लोके हे माजी जिल्हा परिषद सदस्या वृषाली लोके यांचे सुपुत्र आहेत , त्यांना खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे व पालकमंत्री नितेश राणे यांनी उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. महायुतीचे उमेदवार असल्याने आपला विजय सोपा असल्याचा विश्वासही अमोल लोके यांनी व्यक्त केला. आपल्या विकासदृष्टीबाबत बोलताना अमोल लोके म्हणाले की, पंचायत समिती गणातील अनेक सर्वसामान्य नागरिकांची तालुकास्तरावरील किरकोळ शासकीय कामे प्रलंबित राहतात. या कामांसाठी नागरिकांना वारंवार वेळ खर्च करावा लागतो. ही कामे कमीत कमी त्रासात व वेळेत कशी होतील, यासाठी मी प्रयत्नशील राहीन. तसेच सर्व शासकीय योजना व सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचल्या आहेत की नाहीत, याची खात्री करून त्या मिळवून देणे हे माझे कर्तव्य असेल. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मी २४ तास मतदारसंघातील जनतेसाठी उपलब्ध राहीन, असेही त्यांनी सांगितले.
येणाऱ्या ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानात शिवसेना-भाजप महायुतीचे कुणकेश्वर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सुनील बाळकृष्ण पारकर तसेच ओपन कुणकेश्वर पंचायत समितीचे उमेदवार अमोल लोके यांच्या निशाणीसमोरील बटन दाबून आम्हाला काम करण्याची संधी द्यावी, असे आवाहन ते मतदारांना प्रचारा दरम्यान करत आहेत.
या प्रचारात ग्रामपंचायत सदस्य आशुतोष कातवणकर, बाळा शेगुलवाडकर, मिलिंद मांजरेकर, दीपक राणे, माजी सभापती मनोज सारंग, माजी सरपंच लवेश भाबल, नंदू कांदळगावकर, जितेंद्र भाबल, रमाकांत सनये, रमेश सनये, सरपंच अंजिता कोचरेकर, दाजी कोचरेकर, विराज भाबल, दिनेश मालवणकर, सतीश मालडकर, प्रदीप कोंयडे, महेश घाडी, संतोष लोके , भाजपा तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, जिल्हा चिटणीस प्रकाश गोगटे देवगड जामसंडे नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर,युवा मोर्चा शहर अध्यक्ष दयानंद पाटील, नरेश डामरी, प्रल्हाद गावडे,यांच्यासह महिला भगिनी व अनेक महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी झालेले पहायला मिळत आहे..












