खोरनिनको येथील धरण आणि धबधब्यावर जाण्यास करण्यात आला मज्जाव

लांजा तहसीलदार प्रमोद कदम यांच्याकडून मनाई आदेश जारी

संतोष कोत्रे | लांजा:  तालुक्यातील खोरनिनको येथील धरण आणि धबधबा या ठिकाणी पर्यटनासाठी जाण्यास लांजा महसूल प्रशासनाकडून मज्जाव करण्यात आला आहे. तशा प्रकारचे मनाई आदेश जारी करण्यात आले असून या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अंतर्गत कारवाई करण्यात येईल असे तहसीलदार प्रमोद कदम यांनी या आदेशात म्हटले आहे. तालुक्यातील खोरनिनको येथील धरण आणि मानवनिर्मित धबधबा हे ठिकाण पावसाळी पर्यटन ठिकाण असल्याने या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. सध्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून त्यामुळे धरणाची पाणी पातळी देखील वाढली आहे. अशा परिस्थितीत पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या जीविताला धोका संभवतो आहे. सध्या या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढलेली दिसत आहे.

अशा परिस्थितीत मानवी जीविताला धोका उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तहसीलदार प्रमोद कदम यांनी खोरनिनको धरणावर मौजमजा करण्यासाठी जाण्यास पर्यटकांना मज्जाव केला आहे .दिनांक २१ जुलै रोजी या प्रकारचे प्रतिबंधात्मक आदेश जाहीर जाहीर करण्यात आले असून पुढील दोन महिन्यांसाठी पर्यटकांसाठी हे धरण आणि धबधबा प्रतिबंधित करण्यात आले आहे. दरम्यान या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करून कोणी धरणावर गेल्यास त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३ मधील दंड कलम अन्वये तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अंतर्गत कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील प्रमोद कदम तहसीलदार यांनी या दिला आहे.