कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शासकीय कार्यालयांत शुकशुकाट

राजापूर तहसिलदार कार्यालयाबाहेर बेमुदत संपात सहभागी झालेले कर्मचारी.

राजापूर | वार्ताहर : जूनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्याच्या मागणीसाठी सरकारी-निमसरकारी कर्मचारी, शिक्षक यांनी आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामध्ये तालुक्यातील महसूल, पंचायत समिती विभागातील कर्मचाऱ्यांसह शिक्षक सहभागी झाले आहे. हा संप 100 टक्के यशस्वी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या संपामुळे शासकीय कार्यालयांमध्ये गुरूवारी शुकशुकाट पसरलेला होता. तर, शासकीय कामांसाठी आलेल्या लोकांना कामे न करता रिकाम्या हाती घरी परतावे लागले.

दरम्यान, संपकरी कर्मचाऱ्यांनी तहसिलदार आणि पंचायत समिती कार्यालयाच्या आवारामध्ये आपल्या मागण्यांची जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशी या कर्मचाऱ्यांकडून सातत्याने शासनाकडे मागणी केली जात आहे.

सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व विभागातील कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. कर्मचार्यांच्या संपातील सहभागामुळे तालुक्यातील शासकीय कामकाज ठप्प झाले होते.