वार्तापत्र -कोकण संतोष वायंगणकर
कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्याच राजकारण वेगवेगळया पातळीवरचे आहे. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगट, शिवसेना एकनाथ शिंदेगट आणि भारतीय जनता पार्टी या तीन्ही पक्षांकडून वर्चस्वाचे प्रयत्न नेहमीच राहीले आहे. सिंधुदुर्गात तर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत केवळ औपचारिकता उरली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचा वरचष्मा राहील. आठवर्षानंतर पुन्हा एकदा कोकणातील जिल्हा परिषदेत जनतेने निवडलेल्या लोकप्रतिनिधींची सत्ता असणार आहे…
महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषद, पंचातय समिती निवडणुका पार पडल्या आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका या तब्बल आठ वर्षानंतर होत आहेत. मधल्या आठ वर्षात प्रशासकीय राजवट होती. प्रशासकीय राजवटीत कुणाचाही अंकुश रहात नाही. अधिकारी म्हणतील ती पूर्वदिशा असाच कारभार जिल्हा परिषद, पंचायत समितीतून होत असतो. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यच नाहीत म्हटल्यावर ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्न आणि चर्चा जिल्हा परिषदेत होणारच कशी ? अशा या प्रशासकीय कारभारात आठवर्षे निघून गेली. जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुका न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असल्याने गेली आठवर्षे अनेक कारणांनी निवडणुका पुढे ढकलत गेल्या. या मागील आठवर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाचे सारे संदर्भ बदलले. बदललेल्या राजकारणाचे प्रतिबिंब प्रत्येक निवडणुकीत उमटत राहीले आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्याच राजकारण वेगवेगळया पातळीवरचे आहे. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगट, शिवसेना एकनाथ शिंदेगट आणि भारतीय जनता पार्टी या तीन्ही पक्षांकडून वर्चस्वाचे प्रयत्न नेहमीच राहीले आहे. गेली अनेकवर्षे रायगडच्या जिल्हा परिषदेत शेतकरी कामकरी पक्ष पाटील बंधूमुळे सत्तेवर होता. त्याकाळी राष्ट्रीय काँग्रेसही रायगडमध्ये मजबुतीने उभी होती. परंतु मधल्याकाळात खा. सुनिल तटकरेंच्या रायगडातील ‘एण्ट्री’ने जिल्ह्याच राजकारण बदलत गेलं. पंचायत समितीचे सभापती ते खासदार या राजकीय प्रवासात खा. सुनिल तटकरे यांनी कधी समझोत्याने सोबत घेत तर कधी सोबत घेऊन राजकारणातून संपवण्यात खा.सुनिल तटकरेंची चाणक्य निती रायगड जिल्ह्याने अनेकवेळा पाहीली आहे. राजकीय आडाखे बांधण्यात आणि कोणाला कोणत्या निवडणुकीत सोबत घ्यायचे आणि कोणाला बाजूला ठेवायचे याचे राजकीय आडाखे बांधण्यात खा.तटकरे वाकबगार आहेत. म्हणूनच शेतकरी कामकरी पक्ष, भाजपा, शिवसेना असे रथी महारथी असतानाही खा.सुनिल तटकरे यांनी रायगड जिल्ह्याचे राजकारण स्वत: भोवता कसं फिरत राहीलं याची त्यांनी नेहमीच काळजी घेत राजकीय वाटचाल चालविली आहे. बाजूच्या रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेला मानणारा तळागाळात मोठा वर्ग आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आदर करणारा आणि आपलं जग म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अशी ठाम मनाची समजूत असणारा मोठा वर्ग आजही रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेत गेली काही वर्षे एकहाती बहुमताची शिवसेनेची सत्ता राहीली आहे. मधल्या राजकीय घडामोडींमध्ये शिवसेना दुभंगली. गेली वीसवर्षे रत्नागिरी जिल्ह्यांचे नेतृत्व करणारे राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे राजकारण आपणाला हवे त्यापद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. गोड बोलून संवाद राखत विरोधकांशी संवाद ठेवत फार नियोजनबद्धरित्या विरोधकच असणार नाहीत याची काळजी ना. उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच घेतली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ना. उदय सामंत यांचे राजकारण पडद्यामागून सांभाळणारे आ.किरण उर्फ भैय्या सामंत वर्षभरापूर्वीच राजकारणात सक्रिय होत राजापूरचे आमदारही झाले. सारी शक्ती वापरून सत्तास्थाने आपल्या हाती कशी रहातील यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न राहीला आहे. राज्याच्या राजकारणात समन्वयकाची भुमिका बजावणाऱ्या उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात विरोधकांना फार वरचढ होऊ द्यायचे नाही हे राजकीय पथ्य मात्र सामंत बंधूनी पाळले आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेतही बहुमत मिळवून सत्ताकेंद्र आपणाकडेच कस राहील असा ना. उदय सामंत व आ.किरण सामंत यांचा प्रयत्न आहे. विरोधकांना आपण कधी बाद झालो हे कळत नाही अशी ना. उदय सामंत यांची खासियत आहे. यामुळेच गेली वीसवर्षे रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात सामंत बंधूची सत्ताकेंद्र राहीली आहेत. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा हा जिल्हा देखिल राजकीय विशेष हालचालींचे केंद्र म्हणून मानले जाते. कोकणच्या राजकारणामध्ये माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रियमंत्री खा. नारायण राणे यांच्या एवढा महाराष्ट्राच्या राजकारणात वजनदार असलेला दुसरा नेता नाही. राज्याच्या राजकारणात ज्यांचा शब्द चालतो त्या खा.नारायण राणे यांच्याच नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लढवल्या गेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर जिल्हा परिषद, पंचायत समितीची सत्ता गेली २७ वर्षे खा.नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहीली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, पंचायत समितीत पदाधिकारी निवडताना खा.नारायण राणे यांनी नेहमीच धक्कातंत्राचा वापर केला आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्याला जिल्हा परिषद अध्यक्षपदाबरोबरच अन्य पदाधिकारी म्हणून संधी दिली आहे. मधल्या आठवर्षाचा कालावधी वगळून गेली २७ वर्षे खा.नारायण राणे ज्या पक्षामध्ये जातील त्याच पक्षाची सत्ता सिंधुदुर्गच्या जिल्हा परिषदेत राहीली आहे. २७ वर्षे राणेंना विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांनी सतत आरोप करूनही सिंधुदुर्गातील जनतेने नेहमीच राणेंची जिल्हा परिषद, पंचायत समितीत साथ दिल्याचे दिसून येईल. खा. राणेंवर सिंधुदुर्गातील जनतेने प्रेम केलं आणि विश्वासही दाखवला आहे. सिंधुदुर्गात खा.नारायण राणे यांना रोखण्यासाठी गेल्याकाही वर्षात अनेक कपटकारस्थान करण्यात आली. आजही तसेच प्रयत्न होतांना दिसतात. परंतु जनतेच्या पाठबळावर सिंधुदुर्गात खा.नारायण राणे यश मिळवत राहीले आहेत. आता तर सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना.नितेश राणे आणि आ.निलेश राणे या राणेबंधूनीही सिंधुदुर्गच्या राजकारणात स्वत:चा असा एक वेगळा ठसा उमटविला आहेच. खा.नारायण राणे यांनी विकासाला प्राधान्य देणारा विचार नेहमीच मांडण्याचा प्रयत्न केला. हाच विकासाला महत्व देत विकासाचाच मुद्दा पुढे नेण्याचा प्रयत्न राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकासमंत्री ना.नितेश राणे व आ.निलेश राणे यांनी चालविला आहे. महायुतीच्या माध्यमातून निवडणुकांना सामोरे जाताना महायुतीत योग्य समन्वय राखण्याचा त्यांचा प्रयत्न राहीला आहे. म्हणूनच सिंधुदुर्गात महायुतीचे ८ जिल्हा परिषद व १७ पंचायत समिती सदस्य बिनविरोध निवडले गेले आहेत. यामुळे सिंधुदुर्गाला तर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत केवळ औपचारिकता उरली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचा वरचष्मा राहील. आठवर्षानंतर पुन्हा एकदा कोकणातील जिल्हा परिषदेत जनतेने निवडलेल्या लोकप्रतिनिधींची सत्ता असणार आहे. सर्वसामान्यांना या सत्ताकेंद्रात न्याय मिळेल अशी आजच्या घडीला अपेक्षा करायला काहीच हरकत नाही.













