BULDHANA | बुलढाण्यात वाहतूक नियमभंग करणाऱ्यांवर धडक कारवाई; २ हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई, १३ लाखांहून अधिक दंड वसूल

 

 

बुलढाणा – बुलढाण्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलीस आणि आरटीओ प्रशासनाने मोठी संयुक्त मोहीम राबवली.. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली काल झालेल्या या धडक कारवाईत २ हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई करत लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला..यामुळे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांचे पुरते धाबे दणाणले आहेत..बुलढाणा शहर पोलीस आणि आरटीओ विभागाने शहरात व्यापक वाहन तपासणी मोहीम राबवली.. यावेळी सायलेन्सर बदललेल्या बुलेट, प्रेशर हॉर्न, प्रखर दिवे आणि फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली..तपासणीदरम्यान अनेक चालकांकडे लायसन्स, विमा आणि पीयूसी सारखी महत्त्वाची कागदपत्रे आढळली नाहीत..या मोहिमेत 2000 पेक्षा जास्त वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, तब्बल 13 लाख रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला आहे. यामध्ये काही वाहनांवर 15,000 ते 27,000 रुपयांपर्यंतचा मोठा दंड आकारण्यात आला, तर गंभीर त्रुटी असलेल्या गाड्या जागच्या जागी जप्त करण्यात आल्या..या मोहिमेत कॉलेज आणि क्लासेसला जाणाऱ्या अल्पवयीन मुलांचीही तपासणी करून त्यांना समज देण्यात आली..यापुढे जर लहान मुले वाहन चालवताना आढळली, तर थेट त्यांच्या पालकांवर कडक कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांनी दिला आहे..वाहन चालवताना हेल्मेट वापरा आणि कागदपत्रे सोबत ठेवा, असे आवाहन प्रशासनाने केले असून शहरातील वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी ही मोहीम अशीच सुरू राहील..