सरगवे पुनर्वसन येथे श्री खंडोबा पंचायतन देवस्थानचा २३ वा वर्धापनदिन सोहळा; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

दोडामार्ग |प्रतिनिधी :दोडामार्ग तालुक्यातील सरगवे पुनर्वसन येथील श्री खंडोबा, सातेरी, केळबाई, शंभू महादेव, म्हारिंगण पंचायतन देवस्थानचा २३ वा वर्धापनदिन सोहळा सोमवार, दिनांक २३ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

वर्धापनदिनानिमित्त सोमवारी सकाळी ९ वाजता सर्व देवतांचा महाअभिषेक करण्यात येईल. त्यानंतर सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, आरती व तीर्थप्रसाद होईल. दुपारी १:३० वाजता सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

सायंकाळी ५ वाजता स्थानिक भजनी मंडळाचे सुश्राव्य भजन होणार आहे. तर रात्री १० वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाची सांगता ‘दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळ, सिंधुदुर्ग’ यांच्या बहारदार दशावतारी नाट्यप्रयोगाने होईल.

या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन सरगवे पुनर्वसन येथील ग्रामस्थ आणि देवस्थान कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. परिसरातील भाविकांनी आणि नाट्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.