मसुरे | झुंजार पेडणेकर प्रवाश्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपप्रादेशिक परिवहन विभाग, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत राष्ट्रीय महामार्ग–६६ वर स्लीपर बसची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.
ही मोहीम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी आशिष लोकरे यांच्या नेतृत्वात पार पडली.
सदर तपासणीदरम्यान स्लीपर बसमधील परवाना, फिटनेस प्रमाणपत्र, विमा, कर भरणा, चालक परवाना आदी कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. त्याचबरोबर प्रवाश्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आपत्कालीन बाहेर पडण्याच्या मार्गाजवळ कोणतेही अडथळे नसल्याची खात्री करण्यात आली तसेच अग्निशामक यंत्रणेची उपलब्धता व ती कार्यक्षम स्थितीत असल्याची तपासणी करण्यात आली. स्लीपर केबिनमधील सुरक्षा नियमांचे पालन होत असल्याचीही पाहणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास संबंधित वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत मोटार वाहन निरीक्षक सचिन पोलादे, संकेत सोमणाचे, पराग मातोंडकर, प्रीतम जाधव यांनी सहभाग नोंदविला. तसेच चालक सिद्धाराम स्वामी व रामदास पाखरे यांनी सहकार्य केले.
प्रवाश्यांच्या सुरक्षिततेसाठी अशा तपासणी मोहिमा नियमितपणे राबविण्यात येणार असून सर्व वाहनचालक व मालकांनी वाहतूक तसेच सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.












