१ मार्चपासून मुंबई–विजयदुर्ग रो-रो सेवा सुरू; पहिल्या फेरीत पालकमंत्री ना. नितेश राणे करणार प्रवास

१ मार्चपासून मुंबई–विजयदुर्ग रो-रो सेवा सुरू; पहिल्या फेरीत पालकमंत्री ना. नितेश राणे करणार प्रवास

कणकवली, दि. २० फेब्रुवारी :
कोकणातील प्रवास व्यवस्थेत महत्त्वाचा टप्पा गाठत मुंबई–विजयदुर्ग रो-रो फेरी सेवा १ मार्चपासून सुरू होत आहे. बहुप्रतीक्षित असलेल्या या जलप्रवासामुळे मुंबई ते विजयदुर्ग बंदर हा प्रवास जलद, सुरक्षित आणि आरामदायी पद्धतीने करता येणार आहे. चाकरमान्यांसह पर्यटकांसाठीही ही सेवा सोयीची ठरणार आहे.

या सेवेला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून पहिल्या फेरीत सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे प्रवाशांसह प्रवास करणार आहेत. त्यामुळे कोकणवासीयांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

वेळापत्रक (१ मार्चपासून लागू):
सकाळी ८.०० वाजता मुंबईहून फेरी प्रस्थान करून दुपारी ३.०० वाजता विजयदुर्ग येथे आगमन होईल. विजयदुर्गहून दुपारी १२.०० वाजता परतीची फेरी सुटून सायंकाळी ७.०० वाजता मुंबईत पोहोचेल. मार्च महिन्यात ठराविक दिवशी ही सेवा उपलब्ध राहणार असून प्रतिसादानुसार पुढे वाढवण्याचा विचार आहे.

या रो-रो सेवेमुळे कोकणातील पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल. स्थानिक व्यापारी, वाहनधारक आणि नागरिकांसाठी वेळ व खर्चाची बचत होणार आहे. रस्त्यावरील लांब आणि थकवणाऱ्या प्रवासाला सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे.

प्रवाशांनी प्रस्थान वेळेच्या किमान ९० मिनिटे आधी बंदरावर उपस्थित राहावे, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. हवामान किंवा तांत्रिक कारणांमुळे वेळेत बदल होऊ शकतो, याची नोंद घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.