▪️१२ देशी गाईंचे गोधन आणि गांडूळ खत प्रकल्पातून साधली आर्थिक प्रगती.
▪️स्वतः विषमुक्त खाणार आणि जगालाही तेच देणार
▪️कट्टा -गुरामवाडीच्या रावले दांपत्याची यशोगाथा

मसुरे | झुंजार पेडणेकर :सेंद्रिय शेती म्हणजे केवळ खत बदलणे नव्हे, तर ती निसर्गाशी नाते सांगणारी एक जीवनपद्धती आहे. सेंद्रिय शेती म्हणजे निसर्गाकडून जे घेतले, ते पुन्हा कृतज्ञतेने निसर्गाला परत करण्याची पद्धत आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. मालवण तालुक्यातील कट्टा गुरामवाडी येथील आनंद रावले हे शेतकरी अशाच सेंद्रिय शेतीचे आयडॉल बनले आहेत. सर्व पिके ही पूर्णपणे शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीनेच घ्यायची. स्वतः विषमुक्त खायचं आणि दुसऱ्यांना विकताना सुद्धा ते विषमुक्तच विकायचं या एका ध्येयाने प्रेरित होऊन आनंद रावले हे शेतकरी आपल्या शेतीमध्ये आपली पत्नी सौ. अनन्या यांच्या सह राबून एक नवीन प्रेरणादायी काम समाजासाठी करत आहेत.
*भातशेतीची सेंद्रिय पद्धत
कट्टा- गुरमवाडी येथील तरुण जिद्दी शेतकरी श्री आनंद वसंत रावले हे रासायनिक शेती सोडून आधुनिक पद्धतीला सेंद्रिय शेतीची जोड देऊन आपली शेती करतात. त्यांची कट्टा येथे वडिलोपार्जित सामाईक 100 गुंठे सामायिक शेती आहे. तर तीन एकर शेती ते दुसऱ्याची करतात. त्यामध्ये पावसाळ्यात पर्याय नसल्याने सेंद्रिय भात शेती करतात. त्यामध्ये दोन एकर शेती ही श्री पद्धतीने केली जाते. तर दोन एकर पारंपारिक पद्धतीने करतात. यासाठी सर्व बियाणे हे देशी वापरले जाते. त्यानंतर रब्बी – उन्हाळी शेती मध्ये कलिंगड, भेंडी, चवली, मूग, मटकी, काकडी, वाली, मिरची, वांगी, भुईमूग अशी पिके घेतात. सध्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्यामुळे काही प्रमाणात शेतीमध्ये घट झाली आहे असे ते सांगतात.
* 15 वर्षांपासून सेंद्रिय शेतीस प्रारंभ
शेती करताना एक दाणाही रासायनिक खतांचा ते वापरत नाहीत. किंवा कोणतेही कीटकनाशक वापरत नाहीत . 15 वर्षापूर्वी रासायनिक कीडनाशकांचे दुष्परिणाम बघून जेव्हा त्यांनी सेंद्रिय शेती करायचे ठरवले त्यावेळी त्यांनी प्रतिज्ञा केली की मी विषयुक्त खाणार नाही आणि विषयुक्त कोणाला देणार नाही. आणि आज ते विषमुक्त शेती करत आहेत. त्यांच्याकडे 12 देशी गाई व दोन म्हशी तसेच नऊ वासरे एवढं गोधन आहे. नुसते जमिनीला शेणखत न देता त्याच्यापासून गो कृपा अमृत, कल्की, जीवामृत, घन जीवामृत ते तयार करतात.
* गांडूळ खताला वाढती मागणी
मिळणाऱ्या शेणाचा वापर हा मोठ्या प्रमाणात गांडूळ खत तयार करण्यासाठी केला जातो. यासाठी त्यांच्याकडे एकूण दहा गांडूळ खताचे बेड आहेत PMEGP योजनेतून त्यांनी हे गांडूळ खताचे बेड उभे केले आहेत. सेंद्रिय शेती व गांडूळ खताचे बेड उभे करण्यासाठी त्यांना मालवण कृषी विभागाचे उप कृषी अधिकारी श्री धनंजय दत्ताराम गावडे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाल्याचे ते आवर्जून सांगतात. देशी गाईपासून मिळणारे दूध हे न विकता ते त्यापासून तूप बनवितात. शुद्ध देशी तुपाचा किलोचा रेट हा अडीज हजार एवढा आहे आणि महिन्याला 10 ते 12 लिटर तूप विक्री होते.गांडूळ खताच्या बेड मधून वर्षाकाठी वीस टन एवढे गांडूळ खत ते तयार करतात . आपल्या शेतीसाठी गांडूळ खत ठेवून बाकी खताची ते विक्री करतात. पंचक्रोशीतील शेतकरी,बागायतदार हे त्यांच्याकडे आधीच खताची मागणी नोंदवितात .12/रुपये प्रति किलो असा त्याचा दर असून त्यापासून साधारण त्यांना एक लाख एवढे उत्पन्न मिळते. तर गांडूळ बीज किंवा कल्चर याची ते प्रति किलो पाचशे ते सहाशे रुपयांना विक्री करून त्यापासून 30 ते 40 हजार रुपये मिळवतात.
*सेंद्रिय शेती प्रचारक पॅनलवर निवड
लहानपणापासूनच शेतीची आवड असल्याने शिक्षण पूर्ण करून शेतीमध्येच आपले करिअर करण्याचे ठरवणे ठरविणारे श्री आनंद रावले हे आगळे वेगळेच असे व्यक्तिमत्व आहे. सगळीकडे रासायनिक शेती होत असताना देखील त्यांनी सेंद्रिय शेतीवर भर दिला आहे यासाठी त्यांना त्याची पत्नी सौ अनन्या यांची मोलाची साथ लाभली आहे. कृषी विभागाच्या विविध मेळाव्यात ते सेंद्रिय शेती, श्री भात लागवड या बाबत मार्गदर्शन करतात.कृषी विज्ञान केंद्र किर्लोस सिंधुदुर्ग यांनी त्यांच्या सेंद्रिय शेतीची दखल घेऊन त्यांच्या सेंद्रिय शेती प्रचारक पॅनलवर निवड केली आहे यासाठी त्यांना तालुका कृषी अधिकारी श्री अमोल करंदीकर,कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख श्री बाळकृष्ण गावडे व डॉ. विलास सावंत हे मार्गदर्शन करत आहेत. * आदर्शवत शेती प्रेरणादायी
सध्याच्या काळात रासायनिक औषधांच्या अतिवापरामुळे सेंद्रिय शेतीचे महत्त्व अनन्यसाधारण झाले आहे.रासायनिक खते वाहून गेल्याने नद्या आणि भूगर्भातील पाणी प्रदूषित होते. सेंद्रिय शेतीमुळे हे प्रदूषण थांबते.जैवविविधते मध्ये मित्रकिडी आणि पक्ष्यांचे संरक्षण होते, ज्यामुळे निसर्गाचे चक्र संतुलित राहण्यास मदत होते.मालवण तालुक्यातील कट्टा गुरामवाडी येथील आनंद रावले हे सेंद्रिय शेती मधून एक आदर्शवत शेतीचे उदाहरण सर्वांसमोर ठेवत आहेत. त्यांच्या या कृतीचा आदर्श घेऊन अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये एक पायलट प्रोजेक्ट म्हणून असा प्रकल्प केल्यास निश्चितच सिंधुदुर्गचा एक वेगळा पॅटर्न कृषी क्षेत्रामध्ये पुढे येऊ शकतो. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी आनंद रावले यांच्या 9420206948 या मोबाइल नंबर वर संपर्क साधल्यास आवश्यक माहिती ते देऊ शकतात.












