घाडीगावकर सहकारी पतसंस्था अध्यक्ष रघुवीर वायंगणकर यांचे प्रतिपादन.
घाडीगावकर समाजाचा वधू-वर मेळावा संपन्न!
मसुरे | झुंजार पेडणेकर : क्षत्रिय मराठा घाडीगावकर सेवा समाज, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचा मुंबई मधील दादर येथे नुकताच उपवर आणि वधू व त्यांचे पालक यांचा परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. दीप प्रज्वलन करून सदर मेळाव्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून घाडीगावकर सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रघुवीर वायंगणकर यांनी उपस्थित असलेल्या वधू-वरांना मार्गदर्शन करताना मुलांनी शक्यतो तीस वयाच्या आत लग्न करणे आवश्यक असून, बरेचसे वधूचे पालक मुलाकडे स्वतःचे घर असावे अशी मागणी करतात. त्यामुळे लग्न जमण्यास उशीर होत असतो. यावर खुलासा करताना मुलगा नोकरीला राहणार कधी आणि पैसे साठवणार कधी आणि तो घेणार कधी याबाबत सविस्तर खुलासा करून काय करावे हे समजावून सांगितले. वधू-वरांच्या लग्नासाठी त्यांच्या पालकांनी तडजोड करणे ही फार मोठी जबाबदारी असते. समाजातील मुलांची समाजातीलच मुलींशी लग्न व्हावीत या उदात्त हेतूने समाज या वधूवरांसाठी नाममात्र शुल्क घेऊन असे उपक्रम घेत असते. त्यामुळे सर्वांनी या उपक्रमासाठी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे असे सांगितले. तर अध्यक्ष घनश्याम गावकर यांनी समाज गेली २२ वर्ष अशा प्रकारचे मेळावे घेत आहे.आणि त्यामुळे समाजातील अनेक मुलांची समाजामध्येच लग्न झालेली आहेत. दर मंगळवारी आणि बुधवारी समाजाचे ऑफिस वधू-वरांसाठी खुलं असते त्याचा त्यानी लाभ घेणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळेला पालक स्वतःच येत असतात आणि उपवराला किंवा वधूला आणत नसतात असं करणे हे संयुक्तिक नसल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. समाजाला शंभर वर्ष पूर्ण झाली असल्यामुळे सर्व समाज एकत्रित आणि संघटित ठेवणे ही काळाची गरज असल्याचेही मतही त्यांनी व्यक्त केले. वधुवर सुचक समितीचे अध्यक्ष विकास घाडीगावकर यांनी वधू-वरांचे परिचय करून दिले. या कार्यक्रमासाठी दर्शना घाडी, आर्या घाडी, रश्मी घाडीगावकर, रामचंद्र घाडीगावकर, अनघा गावकर यांनी नोंदणीचे काम चोख बजावले, तर रघुनाथ घाडीगावकर, संतोष घाडीगावकर, मोहन कुळकर, संदीप घाडी, अभिजित घाडी यांनी संपूर्ण नियोजन केले होते. शेवटी मध्य मुंबई विभागाचे अध्यक्ष नंदकुमार घाडीगावकर यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली. या मेळाव्यासाठी वधू वर व पालक बऱ्याच प्रमाणात उपस्थित होते. विकास शिवराम घाडी यांनी सूत्रसंचालन व पाहुण्यांची ओळख करून दिली. या मेळाव्यास ज्येष्ठ समाज बांधवही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.












