- रत्नागिरीच्या डॉ. सौ. सीमा कदम
- दापोलीचे प्रविण गुजर,
- साडवली देवरुखचे अशोक लिमये,
- सोगमवाडी- देवाचे गोठणे येथील सदानंद झिंबरे,
- निरवडे, सावंतवाडी येथील सुलोचना जाधव यांचा होणार सन्मान
रत्नागिरी :- गेली १४ वर्षे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध अप्रकाशित व्यक्ती किंवा विशेष कार्य करणाऱ्या असाधारण व्यक्ती यांना विविध पुरस्कार देणाऱ्या बोडस चॅरिटेबल ट्रस्टने आपले, सन २०२५-२६ साठीचे कर्तव्यनिष्ठा व कार्यगौरव पुरस्कार जाहीर केले आहेत. कर्तव्यनिष्ठा पुरस्काराचे स्वरूप वैयक्तिक सन्मानपत्र, शाल आणि एक पुस्तक असे आहे, तर कार्यगौरव पुरस्काराचे स्वरूप वैयक्तिक सन्मानपत्र, शाल, पुस्तक आणि रुपये ३,००० असे आहे.. यात रत्नागिरी जिल्ह्यातील ४ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १ व्यक्तीचा (त्या पैकी २ महिला यांचा समावेश आहे. प्रथमच महिला एन.सी.सी. अधिकाऱ्याचा सन्मान करण्यात येत आहे.
रत्नागिरी येथील २ महाराष्ट्र नेव्हल एनसीसी युनिट येथे १८ वर्षे एन.सी.सी ए.एन.ओ. म्हणून काम करताना मेजर पदापर्यंत गेलेल्या आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे वाणिज्य विभागाच्या उपप्राचार्य असलेल्या, मेजर डॉ. सौ. सीमा शशिकांत कदम यांना कर्तव्यनिष्ठा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. लांजा तालुक्यातील भांबेड गावाच्या मूळ रहिवासी असलेल्या सीमा कांबळे यांचे शिक्षण लांजा आणि कोल्हापूर येथे झाले. रत्नागिरीत गोगटे जोगळेकर महाविद्यालयात रुजू झाल्यावर प्रथम राष्ट्रीय सेवा योजनेत कार्यक्रमअधिकारी म्हणून काम केले. २००७ साली महिला एन.सी.सी ए.एन.ओ. या पदावर रक्षा मंत्रालय भारत सरकार द्वारे थेट नियुक्ती झाली. ग्वाल्हेर येथे ३ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यावर कॅप्टन पद मिळाले. महाविद्यालयात परेड कमांडर, कॅम्प प्रमुख, मेमू या समुद्रातून हाताने व्हलवत न्यायच्या नौकेवरील १० दिवसाच्या नौसैनिक अभियानात महिला अधिकारी अशा जबाबदाऱ्या पार पडल्या. राष्ट्रीय पातळीवर महासंचालक गौरव पुरस्कार प्राप्त झाला. १८ वर्षे काम करताना पुढे मेजर पदापर्यंत यशस्वी पदोन्नती प्राप्त झाली.
दाभोळ – गुजर आळी (दापोली) येथील व्यवसायाने किराणा मालाचे व्यापारी असलेले परंतु वाचनसंस्कृती जतन करण्यासाठी गेल्या ५० वर्षात स्वखर्चाने लाखभर रुपयांची विविध विषयांवरील शेकडो पुस्तके खरेदी करून खाजगी संदर्भ ग्रंथालय निर्माण केलेले आंबा बागायतदार श्री. प्रविण पर्शुराम गुजर हे डॉक्टर मुलगा आणि सून यांना लागेल तो संदर्भ संदर्भ देण्यासाठी अनेक पुस्तकात विविध खुणा घालून ठेवतात. त्या शिवाय आंबा कलमे बंधणे शिकून आंब्याची बाग विकसित केली आहे. शेतीची आवड असल्याने विविध प्रकारची झाडे लावून प्रयोग करत असतात.
साडवली देवरुख येथे ऑफसेट प्रिंटींग आणि बुक बाईंडिंगचा व्यवसाय करताना, १५० पेक्षा जास्त देशांची नाणी व नोटा जमवण्याचा छंद जोपासताना, गेल्या २६ वर्षात देवरुख दशक्रोशीत वीज वहन यंत्रणेत बिघाड झाल्यावर आपला वेळ देऊन, पदरमोड करून लोकांची गैरसोय दूर करून जनमित्र बनलेले श्री. अमेय अशोक लिमये
सोगमवाडी – देवाचे गोठणे राजापूर येथील दगडात कोरलेल्या अतिप्राचीन श्री नागदोबा देवस्थानाचे मानकरी म्हणून सुमारे ३० वर्षे भाविकांची सेवा, तसेच घनदाट जंगल, बारमाही न आटणारी नागदोबा कोंड (जलस्त्रोत) व प्राचीन कातळशिल्पे यांचे संवर्धन करणारे श्री. सदानंद तानाजी झिंबरे, आणि
सिधुदुर्ग जिल्ह्यातील निरवडे (तालुका सावंतवाडी) येथील वयाची ७५ वर्षे पूर्ण करूनही गेली २६ वर्षे दररोज अप डाऊन असा शेकडो किलोमीटरचा प्रवास करून काकडी, भाजी, हंगामी उत्पादने विकणाऱ्या स्वयमरोजगारीत श्रीमती सुलोचना अंकुश जाधव (गावकार) या ४ जणांना कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
पुरस्कार प्राप्त ५ व्यक्तींपैकी पैकी रत्नागिरी बाहेरील ४ सन्मानिताना त्यांचे सन्मानपत्र, पुस्तक, शाल आणि पुरस्काराची रक्कम त्यांच्या कार्याच्या ठिकाणी स्पीड पोस्ट आणि बँक हस्तांतरण द्वारे दिली जाणार आहे. मेजर डॉ. सीमा शशिकांत कदम यांचा गौरव, शुक्रवार दिनांक ६ मार्च २०२६ रोजी करण्यात येणार आहे असे बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्या खजिनदार अॅडव्होकेट सौ. आदिती अभिजित पटवर्धन यांनी कळवले आहे.












