एक सामान्य कार्यकर्ता ते पंचायत समितीचे उपसभापती अभिजित गुरव यांची यशस्वी घौडदौड
राजापूर (प्रतिनिधी): राजापूर तालुका पंचायत समितीच्या उपसभापतीपदी भाजपाचे तरूण तडफदार कार्यकर्ते अभिजित गुरव यांची निवड जाहिर होताच भाजपाकडून एकच जल्लोष करण्यात आला. एक सर्वसामान्य कार्यकर्ता ते तालुक्याचा उपसभापती अशी गुरव यांनी घेतलेली झेप निश्चितच राजकारणात काम करणाऱ्या तरूणांसाठी प्रेरणादायी अशी आहे.
कोदवली गावातील रहिवाशी असलेले अभिजित गुरव हे एक यशस्वी असे हॉटेल व्यावसायिक आहेत. समाजकारणातुन राजकारण करताना आपला व्यवसायही आपण वाढविला पाहिजे या भावनेतुनच त्यांनी आपली व्यावसायिक वाटचाल सुरू केली व आज ते तालुक्यातील प्रसिध्द गुरूमाऊली हॉटेलचे मालक आहेत.
लहानपानापासूच सामाजिक कामाची आवड असलेल्या गुरव यांनी कायमच सर्वसामान्यांसाठी पदरमोड करून काम केले आहे. गेली कित्येक वर्षें ते भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. एक कुशल संघटक असलेल्या गुरव यांच्यावर पक्षाने प्रारंभी राजापूर तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. या काळात त्यांनी पक्ष संघटना वाढीसाठी झपाटून काम केले. कोरोना काळात तर त्यांनी तळागाळातील जनतेला पदरमोड करत आवश्यक ती मदत केली. कोणत्याही कार्यकर्त्यावर वा जनतेवर कोणताही प्रसंग वा संकट असो त्यावेळी धाऊन जाणारा हक्काचा माणूस अशी त्यांची ओळख आहे. पक्षाच्या प्रत्येक कामात व कार्यात झोकुन देऊन काम करणारा पक्षाचा एक जबाबदार कार्यकर्ता अशी त्यांची पक्षात प्रतिमा आहे.
तालुका अध्यक्षदानंतर पक्षाने त्यांना जिल्हा कार्यकारणीवर उपाध्यक्ष म्हणूनही संधी दिली होती. तर आता नव्याने जाहिर झालेल्या जिल्हा कार्यकारणीत त्यांची पक्षाने जिल्हा सरचिटणीस म्हणून नियुक्ती केली आहे.
नुकत्याच झालेल्या पंचायत समिती निवडणूकीत गुरव हे धोपेश्वर पंचायत समिती गणातुन भाजपाचे उमेदवार म्हणून निवडून आले. गुरव यांना जिल्हा परिषद निवडणूक लढवायची होती, मात्र पक्षाने त्यांना पंचायत समितीची उमेदवारी दिली व ते निवडूनही आले. गुरव यांच्या रूपाने तब्बल २५ ते ३० वर्षांनी भाजपाला पंचायत समितीत प्रतिनिधीत्व मिळाले आहे. पंचायत समितीवर महायुतीची निर्वीवाद बहुमताने सत्ता असल्याने भाजपाकडून त्यांना उपसभापतीपदाची संधी देण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीने भाजपामध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांची निवड होताच भाजपाकडून एकच जल्लोष करण्यात आला. गुरव याच्या निवडीनंतर भाजपासह धोपेश्वर पंचायत समिती गणातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह कोदवली गावातील ग्रामस्थांनीही गुरव यांचे अभिनंदन केले.
सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी पदाचा वापर –अभिजित गुरव
धोपेश्वर गणातील जनतेच्या आशिर्वादाने व पक्षाने दाखविलेल्या विश्वासाने आपल्याला या पदी काम करण्याची संधी मिळाली आहे. निश्चितच या पदाच्या माध्यमातुन तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न व समस्या सोडवून त्यांना न्याय देण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया गुरव यांनी उपसभापतीपदी निवडीनंतर दिली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व खासदार नारायण राणे, मंत्री ना. नितेश राणे, जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आंम्ही पक्षासाठी काम करत आहोत, त्याची दखल घेत पक्षाने या पदावर काम करण्याची आपल्याला संधी दिल्या बद्दल गुरव यांनी आभार व्यक्त केले आहेत, तर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत यांचेही गुरव यांनी आभार मानले आहेत. आपल्याला मिळालेले हे पद सर्वसामान्य जनतेचा व पक्षाच्या तमाम पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.












