सामाजिक बांधिलकीचा जपला वारसा
रत्नागिरी: जीवनाच्या धकाधकीतून विरंगुळा मिळावा आणि भजन मंडळातील सदस्यांमध्ये कौटुंबिक जिव्हाळा निर्माण व्हावा, या उद्देशाने पूर्णगड येथील श्री देव महापुरुष भजन मंडळाचा अनोखा कौटुंबिक सोहळा नुकताच कर्नाटक येथील गोकर्ण व मुरुडेश्वर येथे उत्साहात संपन्न झाला. केवळ अध्यात्मच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपणारे मंडळ म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.
भजन मंडळातील कलाकार जेव्हा कार्यक्रमांसाठी बाहेर जातात, तेव्हा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणाऱ्या पत्नी आणि मुलांचा सहभाग महत्त्वाचा असतो. हीच जाणीव ठेवून मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाचा सोहळा सहपत्नीक साजरा करण्याचे ठरवले होते. या सहलीच्या निमित्ताने सर्व भजनी कलाकार आपल्या कुटुंबासह एकत्र आले होते.
या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उपस्थित महिला भगिनींचा विशेष सत्कार करण्यात आला. लांजा येथील नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य व नमनसम्राट समाजसेवक यशवंत वाकडे यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी बोलताना वाकडे यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. वर्षभरात भजनांमधून मिळणारे मानधन स्वतःसाठी न वापरता, ते समाजोपयोगी कामांसाठी आणि अशा विधायक उपक्रमांसाठी खर्च करून मंडळाने एक आदर्श निर्माण केला आहे, असे गौरवद्गार त्यांनी काढले. कुठलेही मानधन न घेता केवळ सेवेच्या भावनेने काम करणे हे या मंडळाचे मोठे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
हा कौटुंबिक सोहळा यशस्वी करण्यासाठी रत्नदीप डोर्लेकर, विजय आडविरकर, संदीप आंबेरकर, मनोहर डोर्लेकर, मदनजी डोर्लेकर गुरुजी, वामन डोर्लेकर, रवींद्र डोर्लेकर, दिनेश डोर्लेकर, विजय डावखुरे आणि रवींद्र सारंग यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासुदेव वाघे यांनी केले.











