हॉटेल असोसिएशनच्या शिष्टमंडळाने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट
रत्नागिरी: आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन टंचाई भासण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, हॉटेल व्यवसायासाठी अत्यावश्यक असलेल्या गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत होऊ नये, या मागणीसाठी रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.
सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या घडामोडींमुळे इंधन टंचाई निर्माण होत असल्याचे चित्र आहे. हॉटेल व्यवसायाची मुख्य गरज गॅस सिलिंडर असून, याबाबत टीव्ही व इतर माध्यमांतून तुटवड्याच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यावसायिकांनी प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन वस्तुस्थिती जाणून घेतली आणि सविस्तर चर्चा केली. जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायावर या टंचाईचा परिणाम होऊ नये आणि गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत राहावा, अशी विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांनी हॉटेल व्यावसायिकांच्या अडचणी समजून घेतल्या असून, या संदर्भात गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सींशी बोलून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. या बैठकीला हॉटेल संघटनेचे उपाध्यक्ष उदय लोध, सचिव सुनील देसाई, गणेश धुरी, सुहास ठाकूरदेसाई, वायंगणकर, जोग यांसह जिल्ह्यातील अनेक प्रमुख हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.













