वैभव नाईक यांनी राजकीय स्टंटबाजी करू नये.!
कुडाळ खरेदी-विक्री संघामार्फत ३२ हजार ग्राहकांना नियमित पुरवठा.!
चुकीची माहिती पसरवून जनतेत संभ्रम निर्माण करू नये – दीपक नारकर
स्वप्निल कदम (कुडाळ) :
कुडाळ तालुका खरेदी-विक्री संघामार्फत वितरित करण्यात येणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात कोणताही तुटवडा नसून पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे सुरू आहे. त्यामुळे चुकीची माहिती देऊन सर्वसामान्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू नये, असे आवाहन कुडाळ तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर यांनी केले आहे. त्यावेळी त्यांनी दैनिक प्रहारशी संवाद साधला.
कुडाळ खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून सुमारे ३२ हजार ग्राहकांना नियमितपणे गॅस सिलेंडरचा पुरवठा केला जात असून शासनाकडून मिळणारे सिलेंडर पूर्वीप्रमाणेच नियमानुसार ग्राहकांपर्यंत पोहोचवले जात आहेत. दर दिवशी शासनाकडून दोन गाड्या घरगुती सिलेंडर च्या येत आहेत 700 सिलेंडर दर दिवशी कुडाळमध्ये येत आहेत. खरेदी विक्री संघाकडून यापूर्वी देखील नियमित दर दिवशी 500 सिलेंडर ग्राहकांना वितरित केले जात होते . यामुळे 200 सिलेंडर खरेदी विक्री संघाकडे स्टॉक मध्ये उपलब्ध राहतात खरेदी-विक्री संघाचे कर्मचारी ग्राहकांना सेवा देण्यासाठी तत्पर आहेत. पुरवठा व्यवस्थेत कोणताही खंड पडलेला नसताना काहीजण चुकीची माहिती पसरवून जनतेचा संभ्रम वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका नारकर यांनी केली.
घरगुती गॅस हा सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजांपैकी एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे त्याबाबत भीतीचे वातावरण निर्माण करणे योग्य नाही. ज्या लोकांकडे कोणतेही ठोस काम उरलेले नाही ते केवळ राजकीय स्टंटबाजी करत असल्याचा आरोपही नारकर यांनी केला.
माजी आमदार वैभव नाईक यांनी केलेले आंदोलन हे केवळ राजकीय धडपडीपोटी असून त्यातून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे. अशा प्रकारच्या स्टंटबाजीला कोणताही अर्थ नसल्याची टीकाही नारकर यांनी यावेळी केली.













