उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
सावंतवाडी । प्रतिनिधी : माजगाव – नाईकवाडा येथील माही अनिकेत गावडे नामक दोन महिन्यांच्या मुलीचा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. वेळेत वैद्यकीय अधिकारी उपलब्ध न झाल्याने उपचाराभावी तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. हा प्रकार शनिवारी सकाळी घडला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच तिच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके व पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्यासह पोलीस कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले होते. याबाबत अधिक माहिती अशी की, माही गावडे या चिमुकलीला शुक्रवारी येथील उपजिल्हा रुग्णालयात डोस व लस देण्यात आली होती. त्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिला घरी नेल्यानंतर रात्री उशिरा तिची तब्येत खालावली. शनिवारी सकाळी तिच्या आई- वडिलांनी तिला घेऊन सावंतवाडी रुग्णालयात धाव घेतली. मात्र, त्या ठिकाणी एकही वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी तिला एका खाजगी रुग्णालयात नेले. मात्र तेथे उपस्थित डॉक्टरांनी उपचारासाठी असमर्थता दर्शविल्याने तिला पुन्हा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.
तेथे उपस्थित झालेल्या वैद्यकीय अधि काऱ्यांनीनी तिची तपासणी केली असता ती मृत झाल्याचे घोषित केले. यावेळी उपचाराअभावी आमची मुलगी गमावली, असा वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आरोप करत मुलीच्या आई- वडिलांनी हंबरडा फोडला. त्यानंतर नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेत चिमुकलीच्या मृत्यू मागचे कारण तपासून कोणी दोषी आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी केली. तसेच याबाबतची रितसर तक्रार सावंतवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून हयगय झाल्याने व वेळेत उपचार न झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे