सिंधुदुर्ग जि. प. ची आठवी टर्म उद्या पासून सुरू! 

सत्ता महायुतीची : पण खुर्ची कोणाला ? 

 

अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड उद्या 

 

‘दादांचे’ धक्कातंत्र व कोणाला लॉटरी याची उत्सुकता

 

सिंधुनगरी : प्रतिनिधी

 

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या लोकनियुक्त प्रशासनाची आठवी टर्म उद्या सोमवार पासून जिल्हावाशीयांच्या सेवेसाठी सज्ज होत आहे. उद्या सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांची विशेष बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी निमंत्रित केली आहे. ५० सदस्य संख्या असलेल्या या जिल्हा परिषदेत भाजपाचे २७ शिंदे शिवसेनेचे १४ व भाजप बंडखोर अपक्ष ६ व उबाठा सेना ३ असे बलाबल आहे. या निवडणुकीत महायुतीचा फॉर्मुला खासदार भाजप नेते नारायण राणे यांनी ठरविला होता. व तो एक हाती सत्ता येत यशस्वी झाला होता. आता अध्यक्ष उपाध्यक्षपदी कोणाला संधी मिळते व मागील परंपरेप्रमाणे धक्कातंत्र पाहायला मिळते याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

 

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांची विशेष सभा उद्या सोमवारी दुपारी तीन वाजता होत आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी या निवडीसाठी निमंत्रित केलेल्या या विशेष सभेस पिठासन अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे काम पाहणार आहेत. २१ मार्च २०२२ सुरू झालेली प्रशासकीय राजवट संपुष्टात येणार आहे. व या जि . प. च्या लोकनियुक्त प्रशासनाची आठवी टर्म उद्यापासून सुरू होत आहे!

 

रत्नागिरी जिल्ह्याच्या विभाजनानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद १९ मार्च १९९२ मध्ये अस्तित्वात आली. प्रथम आर बी दळवी हे पहिले जिल्हा परिषद अध्यक्ष झाले होते. त्यानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार नारायण राणे यांचे जिल्ह्यात आगमन झाले व त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर त्यांच्या नेतृत्वाखाली कायम सत्ता राहीली. त्यांनी अनेक कार्यकर्त्यांना संधी दिली. वेळोवेळी धक्का तंत्राचा वापर करत तब्बल तीस कार्यकर्त्यांना त्यानी अध्यक्षपदाचा बहुमान दिला.

 

याही निवडणुकीत त्यांनी भाजप व शिंदे शिवसेना महायुतीच्या मिलनासाठी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा ठरला. ते भाजप शिवसेना विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. भाजप सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या विजयाचे श्रेय नारायण राणे राणे, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार दीपक भाई केसरकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत अशा महायुतीतील नेत्यांना दिले होते. महायुतीची एकतर्फी सत्ता आल्याने व महायुतीतील जागा वाटपाचा फॉर्मुला यशस्वी ठरल्याचे सिद्ध झाले होते. स्वतः नारायण राणे यांनी या महायुतीसाठी व जागा वाटपासाठी पुढाकार घेतला होता.

 

 

 

भारतीय जनता पक्षाचे कमळ चिन्हावर निवडून आलेले अधिकृत संख्याबळ २७ असून यामध्ये श्री प्रमोद पुंडलिक रावराणे, श्रीमती श्रावणी रोहन रावराणे, श्रीमती रिद्धी रितेश सुतार, श्रीमती प्राची देवानंद इस्वलकर, श्री संतोष चंद्रकांत पारकर, श्री मनोज तुळशीदास रावराणे, श्रीमती सुप्रिया संदीप मेस्त्री, श्रीमती शितल अमित दळवी, श्री संदेश श्रीधर सावंत, श्री संजय नामदेव बोबडी, श्रीमती सुयोगी रवींद्र घाडी, श्रीमती अवनी अमोल तेली, श्रीमती अनुराधा महेश नारकर, श्री देवदत्त दामोदर कदम, श्रीमती सावी गंगाराम लोके, श्री सुनील बाळकृष्ण पारकर, श्रीमती क्षमा संदीप हडकर, श्रीमती सुप्रिया संतोष वालावलकर, श्रीमती आरती हरिश्चंद्र पाटील, श्री प्रितेश शंकर राऊळ, श्रीमती शोभा गुलाबराव गावडे, श्री संदीप एकनाथ गावडे, श्री विक्रांत विकास सावंत, श्रीमती अर्पणा वसंत सातोस्कर, श्री प्रमोद मधुकर कामत, श्रीमती श्वेता सूर्यकांत धर्ने , व रामा दशरथ गवस या भाजप सदस्यांनी हा गट स्थापन केला आहे. व गटनेते म्हणून संजय बोंबडी यांची निवड झाली आहे.

शिंदे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर तेरा उमेदवार निवडून आले आहेत. तसेच अपक्ष निवडून आलेल्या एक अशा १४ उमेदवारांचा “सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिवसेना पक्ष” असा गट तयार करण्यात आला असून गटनेते दीपक नारकर या गटाचे प्रमुख आहेत. धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेले शिंदे सेनेचे १३ सदस्य आहेत. शिंदे शिवसेनेमध्ये सौ रुहिता राजेश तांबे, श्रीमती सोनाली सुनील घाडीगावकर, श्रीमती वर्षा मांगिरीश सांबारी, श्रीमती सुमेधा संतोष पताडे, श्री संतोष वसंत साटविलकर, श्रीमती दिपलक्ष्मी सुशांत पडते, श्री नागेश नारायण अईर, श्री तुकाराम चंद्रकांत साईल उर्फ दादा साईल, श्री केशव रमेश नारकर, श्री रुपेश रवींद्र कानडे, श्रीमती यज्ञा देवदत्त साळगावकर, श्री सुधन सोनू कवठणकर, व साक्षी विश्रांत तळवडेकर अशा १३ सदस्यांचे संख्याबळ आहे. व अपक्ष म्हणून निवडून आलेल्या वायरी भूतनाथ येथील सदस्या श्रीमती अक्षता राजन गावडे या गटात सामील झाल्यामुळे शिंदे शिवसेनेचे सदस्य संख्याबळ आता १४ झाले आहे.

६ अपक्ष (भाजपा बंडखोर ) आणि ३ उबाठा पक्षाचे सदस्य एकत्र येत “जिल्हा परिषद विकास आघाडी” नावाचा नवा गट स्थापन करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेमध्ये सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याची भूमिका या गटाच्या वतीने राजन चिके यांनी स्पष्ट केली होती. या गटाच्या गटनेते पदी नितीन राऊळ हे इन्सुली येतील जिल्हा परिषद सदस्य आहेत. मायकल डिसोजा, कोलगाव राजन चिके, फोंडा , रुपेश पावसकर, नेरूर हे ६ अपक्ष भाजपा बंडखोर उमेद्दवार व उबाठा शिवसेनेचे विजय नाईक, आडेली, गंगाराम सडवेलकर, पिंगुळी, संजय गावडे, उभादांडा यांचा समावेश आहे.