आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी न. पं. अग्निशमक यंत्रणेचे प्रयत्न
आग लागण्याचे कारण अस्पष्ट
देवगड / प्रतिनिधी
देवगड पवनचक्कीनजीक नगरपंचायतीच्या कचरा डंपिंग ग्राऊंडमधील कचऱ्याला शनिवारी रात्रीच्या सुमारास आग लागली. नगर पंचायतीच्या अग्निशमक यंत्रणेने घटनास्थळी जात आग विझविण्यासाठी अथक प्रयत्न सुरू केले. परंतु तेथे कचरा मोठ्या प्रमाणात असल्याने रविवारी सकाळपर्यंत ही आग धुमसत राहिली. या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, देवगड, जामसंडे नगर पंचायतीच्या घंडागाड्यांमार्फत नगरपंचायत हद्दीतून गोळा करण्यात येणाऱ्या कचऱ्यासाठी न. पं. प्रशासनाने देवगड पवनचक्कीनजीक एका बागेत सुमारे २० गुंठे परिसरात कचरा डंपिंग ग्राऊंड तयार केले आहे. मात्र, तेथे कचऱ्याचे कोणतेही वर्गीकरण न करता कचऱ्याचा मोठ्या प्रमाणात साठा करण्यात आला आहे. दरम्यान, या कचऱ्याला शनिवारी रात्री अचानक आग लागली. त्यामुळे न. पं. प – शासनाची तारांबळ उडाली. नगराध्यक्षा साक्षी प्रभू, नगरसेवक विशाल मांजरेकर तसेच न. पं. अग्निशमक यंत्रणेसह सफाई कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. या कचरा डेपोनजीक कलम बागा असून संबंधित बागमालकही आपल्या कामगारांसमवेत मदतकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. न. पं. अग्निशमक यंत्रणेकडून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. परंतु ओला व सुका कचरा एकत्रच साठा राहिल्याने कचऱ्याच्या ढिगामध्ये आग धुमसत राहिली होती. ही आग वाऱ्यामुळे पसरू नये, यासाठी रात्री उशिरापर्यंत न. पं. सफाई कर्मचारी लक्ष ठेवून होते. रविवारी सकाळपर्यंत ही आग धुमसत होती.












