रत्नागिरी: प्रतिनिधी प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यात उद्या बुधवार (दि. १८) आणि गुरुवार (दि. १९) मार्च रोजी तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याने डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
काढणीला आलेल्या पिकांचे तातडीने संरक्षण करा
हवामानातील या बदलामुळे तयार झालेली पिके सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा सल्ला देण्यात आला आहे:
-
आंबा व काजू: काढणीस तयार असलेल्या आंबा व काजू फळांची तातडीने काढणी करून ती सुरक्षित व झाकलेल्या ठिकाणी ठेवावीत.
-
कडधान्ये व भाजीपाला: वाळवण्यासाठी उघड्यावर ठेवलेले कडधान्य, काजू बिया, कुळीथ व वाल पावसापासून वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी हलवावेत.
-
कलिंगड व मिरची: परिपक्व झालेली कलिंगड, मिरची, वांगी आणि टोमॅटोची काढणी करून नुकसान टाळावे.
-
काळीमिरी: ज्या मिरीचे १-२ दाणे पिवळे किंवा लाल झाले आहेत, अशा घोसांची काढणी करून ती सुरक्षित ठेवावीत.
फळबागांची निगा
नव्याने लागवड केलेल्या सुपारी, नारळ, आंबा आणि काजू कलमांना सोसाट्याच्या वाऱ्यापासून वाचवण्यासाठी काठ्यांचा आधार द्यावा. आंबा पिकात फळगळ रोखण्यासाठी विद्यापीठ शिफारशीत ‘फळमाशी रक्षक सापळे’ प्रति एकर २ या प्रमाणात लावावेत. तसेच फळे तडकण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ०.२५% बोरॅक्सची फवारणी कोरड्या हवामानात करावी.
पशुधन व कुक्कुटपालन व्यवस्थापन
वाढत्या तापमानामुळे जनावरांना स्वच्छ व थंड पाणी उपलब्ध करून द्यावे. उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी पाण्यात १% गूळ व ०.५% मीठ मिसळून द्यावे. पावसाच्या अंदाजामुळे जनावरांना झाडाखाली न बांधता सुरक्षित गोठ्यात बांधावे. कुक्कुटपालनामध्ये शेडच्या छतावर गवत किंवा नारळाच्या झावळ्या टाकून तापमान नियंत्रित ठेवावे.
तापमान व आर्द्रता
पुढील पाच दिवसांत कमाल तापमान ३२ ते ३५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवेतील आर्द्रता सकाळी ७६ ते ८४ टक्क्यांपर्यंत राहील. विजांपासून संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी ‘दामिनी’ ॲपचा वापर करावा, असे आवाहन तांत्रिक अधिकारी डॉ. यशपाल चव्हाण यांनी केले आहे.












