विद्यार्थ्यांनी साधला “कमळी’शी थेट संवाद :

पेडणेकर विद्यालय तळवडे येथे संवाद कलाकारांशी कार्यक्रम उत्साहात.

संतोष कोत्रे
लांजा -: ती आली, तिने पाहिले आणि तिने जिंकले.. असाच काहीसा माहोल अनुभवास आला तो तळवडे विद्यालयाने आयोजित केलेल्या ‘संवाद कलाकारांशी’ या कार्यक्रमात. झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध कमळी मालिकेतील कमळी अर्थात विजया बाबर हिचे आणि निंगी म्हणजेच साक्षी सुभाष यांचे तळवडे विद्यालयाच्या प्रांगणात आगमन झाल्यानंतर तिला पाहण्यासाठी, तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी प्रशालेच्या विद्यार्थ्यांसह तळवडे गावच्या ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
झी मराठी व ज. गं. पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे, ता. लांजा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संवाद कलाकारांशी’ या कार्यक्रमाचे आयोजन यशोशिखरावर असणाऱ्या कलाकारांकडून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी या उद्देशाने करण्यात आले. तळवडे शिक्षणोत्तेजक संस्था मुंबईचे अध्यक्ष व जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचे डायरेक्टर डॉ. आनंद पेडणेकर यांच्या सहकाऱ्याने कार्यक्रम घेण्यात आला. झी मराठीच्या सुप्रसिद्ध कमळी मालिकेतील कमळी- विजया बाबर व निंगी – साक्षी सुभाष यांच्याशी विद्यार्थ्यांनी थेट संवाद साधला व विविध कलागुण सादर केले. आपल्या खुमासदार शैलीने दुनियादारी फेम अभिनेता, अँकर प्रणव रावराणेंने कार्यक्रमाची रंगत वाढवली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, अभिनयासह कमळीची विशेष मुलाखत घेतली. त्यानंतर झी प्रस्तुत क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम ‘ हा चित्रपट दाखवण्यात आला.
सुरुवातीला विद्यालयाच्या प्रांगणात झीच्या कलाकारांचे टाळ-मृदुंगाच्या गजरात पारंपरिक वेशभूषेकसह दिंडी काढून स्वागत करण्यात आले. यावेळी कमळी, निंगी, प्रणव रावराणे यांनीही दिंडीत सहभाग घेत विद्यार्थ्यांसमवेत नृत्याचा आनंद घेतला.
कार्यक्रमाला तळवडे शिक्षणोत्तेजक संस्था, मुंबई कमिटीचे प्रमुख कार्यवाह मनोहर पाटोळे, कोषाध्यक्ष विजय सावंत, लांजा पंचायत समितीच्या सभापती मानसी आंबेकर, तळवडे ग्रामपंचायत सरपंच रोहिणी आंबेकर, उपसरपंच प्रसाद ढेपे, स्थानिक कमिटीचे उपाध्यक्ष संजय पाटोळे, शाळा समिती चेअरमन, कॅ.नामदेव पाटोळे, मुख्याध्यापक प्रकाश हर्चेकर, स्थानिक संस्थेचे सहकार्यवाह नंदकुमार आंबेकर, कोषाध्यक्ष सुधाकर पाटोळे, सदस्य महंमद पावसकर, स्वाती कदम, शाळा समिती सदस्य विजय पाटोळे, प्रकाश पाटोळे, पोलिस पाटील प्रदीप पाटोळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनंत लांजेकर,आदी मान्यवर तसेच पालक, आजी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमात स्व. जगन्नाथभाई पेडणेकर यांच्या कार्याचा मागोवा, तळवडे शिक्षणोत्तेजक संस्थेची आजवरची वाटचाल तसेच शाळेची गौरव स्थाने व शाळेचा नावलौकिक वाढविणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेहा पाटोळे, गणेश झोरे, स्वरा वासुरकर, श्वेता सावंत, विवेक किल्लेदार, अक्षता सावंत, योगेश प्रिंदावणेकर, शुभम पाटोळे, अविनाश चव्हाण, जनार्दन पाटोळे यांनी मेहनत घेतली.

चौकट- कलाकार हे जनमानसात आपली प्रतिमा कशी रुजवत असतात याचा अनुभव या निमित्ताने आला. या कार्यक्रमानिमित्ताने तळवडे गावातील वृद्ध आजी देखील उपस्थित होती. तिने कमळीला म्हणजेच विजया बाबर हिला, कमळी जाताना माझ्या घराला पाय लाव अशी प्रेमळ विनवणी केली. कमळी ने देखील हो आजी असा प्रतिसाद दिला.