साळशी सरमळेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय भरारी

ब्रेन डेव्हलपमेंट व गुरुकुल परीक्षेत उज्ज्वल यश

वेदांत देवणे जिल्ह्यात प्रथम, राज्यात सहावा

शिरगाव (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा साळशी सरमळेवाडी येथील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून शाळेचा नावलौकिक वाढविला आहे.
ब्रेन डेव्हलपमेंट टेस्ट व गुरुकुल स्पर्धा या दोन्ही परीक्षांमध्ये इयत्ता दुसरीचा विद्यार्थी वेदांत महेंद्र देवणे याने उत्कृष्ट कामगिरी नोंदवत ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत १०० पैकी ९० गुणांसह रौप्य पदक पटकावले, तर गुरुकुल परीक्षेत १०० पैकी ९२ गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम व राज्यात सहावा क्रमांक मिळवला. तसेच इयत्ता पहिलीतील सर्वेश रावले, तृशांक मिराशी, क्रिशा परब आणि इयत्ता तिसरीतील सेजल रावले यांनीही या दोन्ही परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.तसेच गुरुकुल स्पर्धेत सन २०२४ मध्ये इयत्ता पहिलीमध्ये शिकत असताना वेदांत देवणे याने राज्यात पाचवा क्रमांक मिळवला होता. त्यामुळे त्याची ही सलग उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे मुख्याध्यापक श्री. समाधान रमेश कोळी यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शिक्षकांचा सत्कार केला. भविष्यातही विद्यार्थ्यांनी अशीच प्रगती करत शाळेचा व गावाचा गौरव वाढवावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
तसेच या शाळेचे मुख्याध्यापक समाधान कोळी यांनी ‘आशय ज्ञान’ स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झेप घेतली होती.